मंदिरात बूट घालून जाता येणार नाही, तसेच रांगेतून दर्शन घ्या, असे सांगणाऱ्या वृद्ध भाविकाला एका ४० वर्षीय व्यक्तीने चावा घेतल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसालाही धक्काबुक्की व शिवीगाळ केली. महाशिवरात्रीनिमित्त वागळे इस्टेट परिसरातील स्वयंभू अमरनाथ परिसरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

त्यातच जुनागाव येथे राहणारे युवराज ऊर्फ शिवाजी साळुंखे हा दर्शनासाठी रांगेतून न येता, तसेच पायात बूट घालून येत असल्याने मंदिरातील पुजारी व काही भाविकांनी त्याला अडविले. पोलीस नाईक तौसिफखान नईमखान पठाण हे त्या वेळी कर्तव्यावर होते. त्यांनीही युवराज याना हटकले असता त्याने आरडाओरडा करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याला समजविण्यासाठी गेलेल्या सत्तर वर्षीय बाबुराव पाटील यांच्या हाताला व कानाला त्याने चावा घेतला. तसेच पोलीस पठाण यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली.

या प्रकरणी युवराज याच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

विविध ठिकाणी घरफोडय़ांचे सत्र सुरूच

वागळे इस्टेट परिसरातील जीवन सहकार सोसायटीमध्ये फेब्रुवारी महिन्यात चोरीची घटना घडली. घरातील कुटुंबीय कोल्हापूरला देवदर्शनासाठी गेले होते. गावावरून परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरातील कपाटातील दोन लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी सोमवारी रात्री वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीड लाखाची घरफोडी

पूर्वेतील गोलवली परिसरातील श्रीसद्गुरू कृपा सोसायटीत चोरीची घटना घडली. बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील एक लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाखांची घरफोडी

येथील महागिरी परिसरातील बानू अपार्टमेंटमधील एका घरात चोरी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या इमारतीतील एका ५७ वर्षीय महिलेच्या घरात चोरी झाली. ही महिला काही कामानिमित्ताने घराबाहेर गेली होती. त्या वेळी बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरातून दागिने व रोख रक्कम असा एक लाख दहा हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडीच लाखांची घरफोडी

पूर्वेतील कांचन सोसायटीमध्ये घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील मंडळी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. या संधीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी बंद दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तोडून घरातून दोन लाख ५७ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सव्वातीन लाखांची चोरी

घोडबंदर येथील आनंदनगर भागातील एका सोसायटीत राहणारे राजेंद्रसिंग प्रतापसिंग कार्की (३५) यांच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातून तीन लाख २७ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. या चोरीप्रकरणी घरात काम करणाऱ्या रुक्मिणी माने या मोलकरणीवर संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्याच्या बांगडय़ांची चोरी

पूर्वेतील पेंडसेनगरमधील श्रद्धा बंगल्यात राहणाऱ्या महिलेची दोघा भामटय़ांनी फसवणूक केली. शनिवारी दुपारी दोघा भामटय़ांनी चांदीची भांडी साफ करण्याची पावडर विकण्याच्या बहाण्याने बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर महिलेच्या नकळत घरातून ७२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगडय़ा चोरून नेल्या. डोंबिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.