मद्यधुंद अवस्थेतील पार्टीची चित्रफीत व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत नृत्य केल्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या १२ अभियंत्यांवर  निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका अभियंत्याच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या नृत्य पार्टीमुळे पालिकेची बदनामी झाल्याने ही कारवाई केल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पालिकेचे बांधकाम अभियंता स्वरूप खानोलकर यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या महिन्यात एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत पालिकेचे काही कनिष्ठ अभियंते मद्यधुंद अवस्थेत सिनेमा संगीताच्या तालावर नृत्य करत असल्याचे दिसून आले. या पार्टीत अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डरही सहभागी झाल्याची चर्चा होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी स्वरूप खानोलकर यांच्यासह  नरेंद्र संखे, योगेश सावंत, रोशन भगत, केयुर पाटील, प्रवीण मुळीक, निनाद सावंत, कौस्तुभ तामोरे, नीलेश मोरे, इंद्रजीत पाटील, परमजीत वर्तक, युवराज पाटील या बारा कनिष्ठ अभियंत्यांना निलंबित केले. पार्टी खासगी असली तरी कुठे कसे वागायचे याचे भान असायला हवे होते. त्यामुळे या सर्वावर निलंबनाची कारवाई केली आहे, असे पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले.