येथील आयरेगाव परिसरातील क्रांतीनगर वसाहतीत राहणाऱ्या आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी रामनगर पोलिस ठाण्यात अर्जुन पवार याच्याविरोधात तक्रार दिली आहे. बिस्किटाचे आमिष दाखवून मुलाचे हात बांधून व तोंडाला चिकटपट्टी लावून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पवार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

चार लाखांची रोकड लंपास
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील टाटा पॉवर नाका येथील किराणा मालाचे दुकान असून त्याचे मालक भिवंडीतील धामणकरनाका परिसरात रहातात.  १० जून रोजी रात्री ते दुकान बंद करुन घरी निघून गेले. रात्रीच्या वेळी चोरटय़ांनी त्यांच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानातील चार लाख रुपयांची रोख रक्कम चोरली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावणे दोन लाखांची घरफोडी
डोंबिवली – अंबरनाथ येथील आडिवली गावातील तुकाराम प्लाझा येथे राहणारे व्यापारी काही दिवस बाहेरगावी गेले होते. ते घरी नसताना चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाच्या कडीचा स्क्रु काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरटय़ाने त्यांच्या कपाटातील १ लाख ८४ हजार २०० रुपये किंमतीचे दागिने चोरले. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमध्ये मंगळसूत्र चोरी
कल्याण – पूर्वेतील लक्ष्मीबाग येथील द्वारकापुरी सोसयाटीत राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ५५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरटय़ाने खेचून नेले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ मे रोजी ती महिला मुलगा रोहन याला शाळेत सोडून घरी परतत होती. त्यावेळी घराच्या परिसरातच चोरटय़ाने तिच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचले.

२१ लाखांचा गंडा
कल्याण – पश्चिमेतील संतोषीमाता रोड येथील सुरेश टॉवर येथे राहणारे रविंद्र लक्ष्मण भोईर यांना १० ते १२ जणांनी विविध कंपन्यांचे कर्मचारी असल्याचे सांगून कर्ज मंजूर करुन देतो अशी बतावणी केली. तसेच रविंद्र यांना २१ लाख २४ हजार ५३१ रुपये या कंपन्यांच्या नावे अकाऊंटमध्ये भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ही रक्कम भरली. मात्र त्यांना कर्ज मिळाले नाही. तसेच भरलेले पैसेही परत मिळाले नाहीत. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेरीवाल्यांविरुद्ध गुन्हे दाखल
डोंबिवली – पश्चिमेतील उमेशनगरनाका येथील रिक्षास्टॅण्डजवळ साईलिला चायनीज कॉर्नर चालविणारा फेरीवाला पंढरीनाथ गणपत पवार याच्या विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घनश्याम गुप्ते रोडलगत असलेल्या चंदमा वाईन्स दुकानासमोर आंबे विक्री करणाऱ्या अरुणकुमार रामसजीव गुप्ता या फेरीवाल्याविरोधात विष्णुनगर पोलीास ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपी चौकातील राकेश वामन म्हात्रे यांच्या मोकळ्या जागेच्या कंपाऊंडजवळ सार्वजनिक रोडवर आंबे विक्री करणाऱ्या संजयकुमार सजनलाल गुप्ता यांच्याविरोधातही विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिजन अर्जुन देवनाथ हा फेरीवाला पश्चिमेतील भगत आर्केड राज चायनिज गाळा समोरील पदपथावर उघडय़ावर चायनिजची विक्री करत असल्याने त्यांच्या विरोधात विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.