वागळे इस्टेट परिसरातील उपाहारगृह व्यवस्थापकाने बिल मागितले म्हणून त्याला जिवे मारण्याची धमकी देत दहा हजार रुपये दर महिन्याला देण्याची धमकी एका गुंडाने दिल्याची घटना बुधवारी घडली. राधा कृष्ण हॉटेलमध्ये जाकीर शेख हा त्याच्या काही साथीदारांसोबत नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये आला आणि त्याने चहा व आईस्क्रीमची मागणी केली. वेटरने त्याला बिल दिल्यानंतर संतापलेल्या शेख याने बिल दिले नाही. व्यवस्थापनाने त्यास बिल का दिले नाही, अशी विचारणा करताच शेख याने कोणाला पैसे मागतो, तुला धंदा करायचा आहे ना इथे, मला ओळखत नाही का, असे बोलतच जवळच्या भट्टीतील लोखंडी सळई उचलून व्यवस्थापकाच्या अंगावर धावून गेला. तसेच जेव्हा उपाहारगृहात येऊ तेव्हा दहा हजार रुपये द्यायचे, अशी धमकी दिली. पैसे दिले नाही तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन नोंदवलेली वस्तू मिळालीच नाही..   
अंबरनाथ – ऑनलाइन शॉपिंगचे फॅड सध्या जनमानसात रुजत असून याला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन शॉपिंग करू शकता तसेच त्यावर तुमच्या जुन्या वस्तू विकूही शकतात अशा स्वरूपाच्या संकेतस्थळाच्या जाहिराती झळकत आहेत. त्यानुसार क्विकर डॉट कॉम या ऑनलाइन खरेदी-विक्री संकेतस्थळावरून अंबरनाथ येथील एका २७ वर्षीय तरुणाने म्युझिक पॅड खरेदी केले. या पॅडची विक्री करणाऱ्या व्यक्तीशी त्याने फोनवर संभाषण करून त्याच्या खात्यावर ४५ हजार ६०० रुपये भरले; परंतु आरोपीने त्यांना म्युझिक पॅड पाठवलाच नाही तसेच पैसेही दिले नाहीत. तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोळ्यात मिरची पूड टाकून चोरी
अंबरनाथ – नागरिकांना मारहाण करून जबरीने त्यांच्याकडून ऐवज चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच चोरटय़ांनी आता चोरीसाठी मिरची पावडरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अंबरनाथ परिसरातील कानसई भागात एका तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याकडील एक लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तरुण हा त्याच्या दुकानातील एका व्यक्तीस सोडण्यासाठी कानसई येथे आला होता. मोटारसायकल थांबवताच चौघा चोरटय़ांनी त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि त्यांच्या गळ्यातील बॅग हिसकावून नेली.

फसवणूक करून सोन्याच्या बांगडय़ा पळविल्या
उल्हासनगर – फेज तीनमध्ये राहणाऱ्या ६२ वर्षीय महिलेला फसवून चोरटय़ांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगडय़ा चोरल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी ही महिला गुरुद्वारातून दर्शन घेऊन घरी जात होती. कवाराम पुतळा ते उल्हासनगर पोस्ट ऑफिस या भागात एका व्यक्तीने त्यांना प्रकाश ऑटो कुठे आहे, असे विचारले. महिलेने तिला माहीत नाही, असे बोलताच समोरच्या इमारतीतील मालकाला मुलगा झाला असून तो पैसे वाटत आहे. तुम्हीपण चला. तुम्हालाही पैसे मिळतील अशी खोटी बतावणी केली. पैसे मिळणार म्हणून महिला त्याच्यासोबत जाण्यास तयार होताच दुसऱ्या एका व्यक्तीने तुम्ही गरीब दिसलात तर तुम्हाला पैसे मिळतील, असे सांगून हातातील बांगडय़ा काढून पर्समध्ये ठेवण्यास सांगितले. चोरटय़ांनी त्यांची ही पर्स लांबविल्याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सवा लाखाची चोरी
कल्याण – पश्चिमेतील गांधार रोड परिसरातील अग्रवाल महाविद्यालयाजवळ एका व्यक्तीने आपली मोटारसायकल उभी केली होती. चोरटय़ाने त्यांच्या मोटारसायकलच्या डिकीतील प्लॅस्टिकची पिशवी पळविली असून त्यातील सवा लाखाची रोकड व बँकेचे धनादेश पुस्तक चोरीला गेल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.