रस्त्यावर पायी चालत येऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचल्याची घटना रविवारी ठाण्यात घडली. वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या माया रमेश दिवाकर (४७) या रविवारी दूध घेऊन घरी जात होत्या. तेव्हा शिवाजीनगर येथील सावंत निवासजवळ पाठीमागून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून शेजारच्या गल्लीतून पलायन केले. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनसाखळी चोऱ्यांच्या घटनांमध्ये गेल्या चार दिवसांत वाढ झाली आहे. ती रोखण्यासाठी पोलिसांनी अद्यापही कठोर कारवाईची पावले उचलली नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
पोलिसांनी सोनसाखळी चोरांना नेस्तनाबूत करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी विशेष पथकांची नेमणूक केली होती. परंतु जिल्ह्यातील सोनसाखळी चोरीची घटनांमध्ये अद्याप घट झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस फक्त कागदोपत्री उपाययोजनांचीच माहिती देत आहेत; परंतु कृती काहीच नाही, अशी प्रतिक्रिया एका सामाजिक कार्यकर्त्यांने दिली.
दोन दुचाकींची चोरी
ठाणे : भिवंडीतील निजामपुरा भागातील जुबेर नरुलहुद्दा अन्सारी यांची मंगळवारी घराजवळून दुचाकी चोरण्यात आली. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगर येथे राहणारे सुमित नानीकराम वाधवानी याची घराच्या आवारातून गुरुवारी दुचाकी चोरण्यात आली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुकानातून मोबाइल चोरी
ठाणे : दुकानात खरेदीच्या बहाण्याने येऊन मोबाइल चोरल्याची घटना सोमवारी ठाण्यात घडली. सनी महेश मल्होत्रा यांच्या घोडबंदर मार्गावरील आर मॉलमधील दुकानात तीन व्यक्ती खरेदीसाठी आल्या. या तिघांनी एक मोबाइल विकत घेऊन दुसरा नऊ हजार रुपये किमतीचा मोबाइल हातचलाखीने चोरला. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रस्त्यात महिलेला लुटले
कल्याण : रामबाग परिसरात राहणाऱ्या मुरलीधर सोमा देवकर या शनिवारी सायंकाळी कल्याण जनता सहकारी बँकेतून काढलेले पैसे घेऊन घरी जात असताना कोळसेवाडी येथील उतेकर बिल्डिंगजवळील चौकात पाठीमागून आलेल्या चोरटय़ाने त्यांना धक्का देत हातातील पिशवी खेचून पोबारा केला. त्यात एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बँक व्यवस्थापनाने विविध शाखांमध्ये चोरांपासून पैशांचे संरक्षण करण्यासाठीचे सचित्र फलक लावण्यात आले आहेत. यातून काही ग्राहक दक्षता बाळगतात, मात्र रस्त्यांवर महिलेच्या हातातील रक्कम लुटण्याची घटना गंभीर आहे. याविरोधात पोलिसांनी त्वरीत पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.