कल्याणमध्ये रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असून, एका मुजोर रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याला अन्य रिक्षाचालकांनी धक्काबुक्की केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण, डोंबिवली परिसरात रिक्षाचालकांविरोधात तक्रारी आल्याने वाहतूक पोलिसांनी वेगवेगळ्या रिक्षा थांब्यावर विशेष गस्त ठेवली आहे. कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असणारे  सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख (५०) यांच्याकडे भाडे नाकारणाऱ्या एका रिक्षाचालकाची तक्रार आली. त्यानुसार संबंधित चालकाविरोधात कारवाई करण्यासाठी ते गेले. कारवाई करीत असताना सात ते आठ रिक्षाचालक घटनास्थळी आले. या रिक्षाचालकांनी गोंधळ घालून पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणला, तसेच देशमुख यांचे दोन्ही हात धरूनत्या रिक्षाचालकास पळून जाण्यासाठी मदत केली.
या प्रकरणी याकूब वाहीद कुरेशी याच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथमध्ये शाळेत २० हजारांची चोरी
अंबरनाथ :  अंबरनाथ शहरातील एका प्राथमिक शाळेत चोरटय़ांनी चोरी करून सुमारे २० हजारांचा ऐवज लुटून नेला आहे. अंबरनाथ येथील कृष्णानगर परिसरात एस निजल्लिंगप्पा प्राथमिक शाळा आहे. शुक्रवारी सायंकाळी शाळा बंद असताना चोरटय़ांनी स्टाफ रूमच्या बाहेरील बाजूचे ग्रिल उचकटवले आणि शाळेत प्रवेश केला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यात सराफाच्या दुकानात चोरी
ठाणे : कळवा भागातील एका सराफाच्या दुकानाचे लॉक तोडून चोरटय़ांनी सव्वा लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना शुक्रवारी घडली असून या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा येथील शिवकृपा सोसायटीत श्रीनिवास रामाप्पा शेठ (३८) राहत असून याच परिसरात त्यांचे अमूल्य ज्वेलर्सचे दुकान आहे. शनिवारी रात्री या दुकानाच्या लोखंडी ग्रिलचे दोन लॉक तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला आणि सुमारे एक लाख २१ हजारांचा ऐवज लुटून नेला.