अंबरनाथमध्ये चोरांचा उच्छाद
एकाच रात्री दोन दुकाने फोडून १७ लाखांच्या मोबाईलची चोरी
अंबरनाथ शहरात गेले काही दिवस रेल्वे स्थानक परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ चालू असून बुधवारी रात्री उशिरा पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे स्थानक परिसरात दोन मोठय़ा मोबाइल विक्रीच्या दुकानातून १७ लाख रुपयांच्या मोबाइलची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयासमोर पूर्वेला नुकतेच उषा एजन्सीज नावाचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान सुरू झाले होते. या दुकानाच्या व्यवस्थापकांनी गुरुवारी सकाळी दुकान उघडले तेव्हा दुकानात ३५ मोबाइलचे खोके असून त्यात मोबाइल नसल्याचे कळल्यावर चोरी झाल्याचे उघडकीस आले. परंतु चोरांनी कोणत्याही स्वरूपाची तोडफोड न करता शटरचे टाळे उघडून ही चोरी केल्याचे समोर आले. दुकानातील सीसीटीव्ही हे दुकान बंद झाल्यावर बंद झाले होते. त्या वेळी त्या इमारतीत असणारे सुरक्षारक्षक मात्र चोरीच्या वेळी तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनाही चोरीबद्दल कळू शकले नाही. या दुकानातून सॅमसंग, एचटीसी, आयफोन आणि सोनीचे एकूण ५ लाख १० हजार रुपयांचे मोबाइल चोरीला गेल्याचे दुकान मालक अदीश यांनी सांगितले. तर याच रात्री पूर्व भागातील रेल्वे स्थानक परिसरातील रिद्धी-सिद्धी या मोबाइलचे दुकान फोडले असून या दुकानातूनही साडेदहा लाख रुपयांचे ११३ मोबाइल चोरीला गेल्याचे दुकान मालक भरत पुरोहित यांनी सांगितले. या दोन्ही प्रकरणांबाबत अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथमध्ये बुधवारच्या दिवसभरातच चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. रात्री दुकाने फोडून मोबाइल चोरी करण्याआधी येथील कानसई भागात चौघांनी एकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून १ लाख रुपये हिसकावून नेले होते. तसेच अंबरनाथ रेल्वे स्थानक पश्चिम भागात आठवडय़ापूर्वी एका व्यापाऱ्याच्या हातातील पैशाची थैली चोरटय़ाने पळवून नेली होती. त्यामुळे घबराट पसरलेल्या या भागात व्यापाऱ्यांनी तक्रार करताच येथील रहदारीच्या मुद्दय़ावर मोठी बैठक घेण्यात आली होती. त्यात या मार्गावर वाहनबंदी तसेच एकदिशा मार्गाचा निर्णय झाला होता. परंतु शहर पोलिसांनी लावलेला एकदिशा मार्गाचा खांब स्थानिक रिक्षावाल्यांनी उपटून टाकला होता. त्यावर हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. चोरीच्या घटनांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोपही काही जणांनी केला आहे.

मुंब्य्रातील तरुणाची गोळी घालून हत्या
मुंब्रा येथे गुरुवारी पहाटे एका तरुणाची अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद खान (३०) असे या तरुणाचे नाव असून तो मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातील राहणारा होता. त्याच्यावर हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत असतानाच हल्लेखोराने त्याला साकेत रोड परिसरात आणून टाकले. पहाटे साडेतीनच्या सुमारास राबोडी पोलिसांना हा प्रकार कळल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मोहम्मद याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी राबोडी पोलीस तपास करत आहेत.
४३ हजारांची घरफोडी
विठ्ठलवाडी- उल्हासनगर कॅम्प चारमध्ये ४३ हजारांची घरफोडी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. घरातील कुटुंब बाहेगावी गेल्याचा चोरटय़ांनी फायदा उठवत कुलूप तोडून त्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.
दागिने चोरताना हाताचे बोटही गायब
ठाणे- सोन्याचे दागिने चोरताना दागिन्यासोबत एका महिलेला आपले बोटही गमवावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.चेंदणी कोळीपाडा परिसरात राहणाऱ्या हेमांगी मालेगांवकर (५४) या गोखले रोड बसस्टॉप ते ठाणे रेल्वे स्टेशन असा प्रवास टीएमटीमधून करीत होत्या. या वेळी बसमध्ये खूप गर्दी असल्याचा फायदा घेऊन चोरटय़ांनी त्यांच्या हाताचे अनामिकेचे बोट कापून त्यातील सोन्याची अंगठी चोरून नेली आहे. आश्चर्य म्हणजे आपल्या हाताचे बोट कापले गेल्याचे त्या वेळी हेमांगी यांच्या लक्षातही आले नाही. कुंजविहार येथे त्या बसमधून उतरल्यावर साडीला रक्त लागल्याने त्यांनी हाताकडे पाहिले असता हाताचे बोटच तुटले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अचानक घडलेल्या या प्रकाराने त्या भयभीत झाल्या. या वेळी बसजवळ उभ्या असलेल्या काही मुलींनी त्यांचे पती सुभाष मालेगांवकर यांना फोन करून त्यांना बोलावून घेतले. सुभाष यांनी त्यांना पाटकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
बसच्या धडकेत एक जण जखमी
डोंबिवली- एस.टी. चालकाचा तोल सुटून एक जखमी व तीन गाडय़ांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. पनवेलहून कल्याणकडे येणारी एस.टी. महामंडळाची बस कल्याण-शीळ रोडला येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या पालनीवेल नावाच्या व्यक्तीस धडक बसली.
फसवणूक करून दागिने लंपास
ठाणे- येथील कोपरी भागातील परांजपे कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाला दोन भामटय़ांनी गंडा घालून तब्बल सव्वा लाखाचे दागिने चोरून नेले आहेत. २० ऑगस्ट रोजी गुरुवारी दुपारी ही घटना घडली. कॉलनीत आलेल्या दोन भामटय़ांनी येथील एका कुटुंबाच्या घरात प्रवेश करीत त्यांना पावडरीने सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगितले. घरातील नागरिकांनीही त्यांना आपले सव्वा लाखाचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले. या वेळी नजरबंदी करून त्यांनी दागिने चोरून नेले.
कुटुंबाने तत्काळ कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला, परंतु सुरुवातीला पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. तब्बल एक आठवडय़ानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली.