पाइपवरून उतरताना पडलेला चोर पोलिसांच्या ताब्यात
ठाणे- कल्याण-शिळफाटा येथील चिंतामणीनगर येथील एका इमारतीत घराची कडी काढून एक चोर आत शिरला. चोरीच्या प्रयत्नात असलेल्या या चोराला काही रहिवाशांनी बघितले. त्यामुळे गोंधळलेला चोर छतावरून पाइपच्या साहाय्याने खाली पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हात सटकल्याने हा चोर खाली पडला आणि त्याच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली. जखमी अवस्थेत पळणे शक्य होत नव्हते. त्याच वेळी तेथे आलेल्या रहिवाशांनी या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. इकराम अब्दुल खाशीक (४०) असे या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोलण्यात गुंतवून ७९ हजारांना लुटले
ठाणे- ठाण्यातील गोकुळनगर येथील युनियन बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या एक व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडून ७९ हजारांची लूट केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. कळव्यातील सह्य़ाद्री शाळेसमोर राहणारे एक व्यक्ती एका व्यापाऱ्याकडे कामाला होते. तेथून ७९ हजार रुपयाची रक्कम गोकुळनगर येथील युनियन बँकेत भरण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने तुला शेठजीने बँकेत तीन लाख रुपये भरायला सांगितले आहेत. माझ्या घरी बाकीचे पैसे आहेत ते घेऊन ये, असे त्या नोकराला सांगितले. पैसे आणण्यासाठी गेल्याचा फायदा घेत ७९ हजारांची रक्कम चोरटय़ाने लंपास करून तेथून पलायन केले.

रिक्षाचालकाची कमाई लंपास
कल्याण- कोनगाव येथे राहणारा एक रिक्षाचालक घराच्या हप्त्याचे पैसे घेऊन बँकेत भरण्यासाठी निघाला होता. सुमारे आठ हजार रुपयांची रक्कम एका पाकिटात भरून रिक्षा घेऊन हा चालक कल्याणात निघाला होता. कामासाठी रस्त्यामध्ये त्याने रिक्षा थांबवून जवळच्या एका दुकानामध्ये तो गेला होता. त्याच वेळी त्याच्या रिक्षामध्ये ठेवण्यात आलेले हप्त्याचे सुमारे ८ हजार रुपये चोरटय़ांनी लंपास केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाकाबंदी असल्याचे भासवून लुबाडले
ठाणे- भिवंडीत राहणाऱ्या ५६ वर्षीय महिला गोपाळनगर येथील भावाला भेटून घरी परत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांचा रस्ता अडवला. मोटारसायकलवरून आलेल्या या दोघांनी या महिलेला अडवून पुढे पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे तुमचे दागिने काढून द्या असे सांगून सुमारे ११ गॅ्रम वजनाची १० हजार किमतीची चेन काढून घेतली. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार दाखल केली आहे.