११ जुलै २०१६चा तो दिवस होता. सकाळी आठ वाजता सुमन नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. ती दररोज सायंकाळी किंवा रात्रीपर्यंत घरी परतायची. मात्र त्या दिवशी ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. तीन वर्षांची मुलगी आणि वयोवृद्ध वडील असा तिचा परिवार. रात्रभर तिची वाट पाहून तिचे वडील दमले. दुसऱ्या दिवसाची पहाट उजाडली तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांना काळजी वाटू लागली. अखेर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुमन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.

उत्तर प्रदेशमधील एका लहान गावात सुमन राहत होती. चार-पाच वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. तीन वर्षांपूर्वी तिला एक मुलगी झाली. वैवाहिक जीवनात सर्व काही आलबेल सुरूअसतानाच काही कारणावरून तिचे पतीसोबत खटके उडू लागले. अखेर रोजच्या कटकटीला कंटाळून तिने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पतीला सोडून ती मुलीला घेऊन माहेरी आली, पण माहेरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे मुलीचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न तिच्यापुढे होता. त्यामुळे तिने मुंबईत नोकरी करायचे ठरवले. दोन वर्षांच्या आपल्या मुलीलाही ती सोबत घेऊन आली होती. दिवा भागात तिने एक घर भाडय़ाने घेतले. या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर ती राहायची. मुलीला सांभाळण्यासाठी तिचे वडील सोबत होते. मात्र वयोवृद्ध असल्यामुळे ते कोणताही कामधंदा करत नव्हते. सुमनच्या पगारावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यामुळे ती बेपत्ता झाल्यामुळे तिचे वडील खचले. शिवाय त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. आठवडाभर त्यांनी तिची वाट पाहिली, मात्र ती घरी काही परतली नव्हती. पोलिसांनाही तिचा शोध लागत नव्हता. त्यामुळे नातीला सोबत घेऊन ते उत्तर प्रदेशला गावी निघून गेले.

३ ऑक्टोबर २०१६चा दिवस उजाडला. सुमनला बेपत्ता होऊन ८४ दिवस पूर्ण झाले. मात्र तिचा शोध काही लागला नव्हता, तसेच पोलिसांना तपासात काही धागेदोरे मिळाले नव्हते. सुमन राहत असलेल्या इमारतीत मनोज सिंह नावाचा भाडेकरू राहत होता. तो घरभाडे भरत नव्हता. त्यामुळे त्या दिवशी घरमालकीण त्याच्या घरी गेली. मात्र त्याच्या घराला कुलूप लावलेले होते. मालकिणीने शेजाऱ्यांकडे त्याची चौकशी केली. त्या वेळी तो गेल्या काही महिन्यांपासून घरी येत नसल्याची माहिती तिला मिळाली. मनोज याच्याशी काही संपर्कही होत नव्हता आणि त्याच्याकडून घरभाडेही मिळत नव्हते. त्यामुळे मालकिणीने नवीन भाडेकरू ठेवायचे ठरविले आणि त्यासाठी घराचे कुलूप तोडून तिने स्वत: घराची साफसफाई सुरू केली. साफसफाई करताना तिने घरातील एका पिंपाचे झाकण उघडले आणि त्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह होता. दरुगधी आणि कुजलेला मृतदेह पाहून शेजाऱ्यांनाही काहीच सुचेनासे झाले. त्यानंतर मुंब्रा पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मृतदेहाच्या अंगावर असलेल्या कपडय़ांवरून ती सुमन असल्याची पोलिसांना खात्री पटली. ज्या दिवशी सुमन बेपत्ता झाली, त्या दिवसांपासून मनोजही बेपत्ता होता. तेव्हापासूनच त्याच्या घराला कुलूप लावले होते, तसेच मनोजच्या घरात सुमनचा मृतदेह सापडल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला.

मुंब्रा पोलीस आणि ठाणे खंडणीविरोधी पथकाने या गुन्ह्य़ाचा समांतर तपास सुरू केला. सुमन एका बँकेत काम करत होती आणि तिचे मनोजसोबत प्रेमसंबंध होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली. मनोज हा उत्तर प्रदेशात पळून गेल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे त्याच्या शोधासाठी दोन पथके उत्तर प्रदेशात गेली, पण तिथे काहीच धागेदोरे मिळत नसल्याने पथके पुन्हा ठाण्यात आली. ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ  पोलीस निरीक्षक एन. टी. कदम यांचे पथक त्याच्या मोबाइल क्रमांकाचा तपास करत होते. पण त्याने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडथळे येत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांनी त्याच्या क्रमांकाच्या सर्व संभाषण नोंदी मागवल्या. त्या वेळी मसाज नावाने बरेच क्रमांक त्यांना आढळून आले. त्यावरून त्यांनी तो मसाज पार्लर व्यवसायाशी संबंधित असावा असा अंदाज बांधला आणि त्या दिशेने तपासाची चक्रे वळवली. मनोजच्या घरात त्याचे एक छायाचित्र पोलिसांना सापडले. ते खबऱ्यांना दाखवून पोलिसांनी त्याच्याकडून माहिती मिळविण्यास सुरुवात केली. अखेर त्यांनी मसाजसंदर्भात वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमधील क्रमांकाच्या आधारे त्याचा शोध सुरू केला. त्यापैकी एक क्रमांक नेमका मनोजचा निघाला आणि तो नालासोपारा भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यामुळे मनोजला पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांचे पथक नालासोपारा भागात गेले. त्यामध्ये पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाजन, पोलीस नाईक नितीन ओवळेकर, प्रशांत भुर्के, सुहास खताते आणि पोलीस हवालदार सुरेश मोरे यांचा समावेश होता. नालासोपारा भागात पथकाने शोध घेऊन मनोजला ताब्यात घेतले. पोलिसांनी पकडू नये म्हणून असे वेशांतर करून तो संतोष प्रजापती नावाने राहत होता. त्याचे खरे नाव विनयकुमार लल्लनप्रसाद भारती असल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले.

पथकाने पोलीस ठाण्यात आणून त्याची सविस्तर चौकशी सुरू केली. त्या वेळी त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. मसाज पार्लरची जाहिरात पाहून त्याने पैसे भरले होते. ती जाहिरात खोटी असल्यामुळे त्याची फसवणूक झाली होती. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने त्याला अशा प्रकारे फसवणूक करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून त्याने अशा खोटय़ा जाहिरातीच्या माध्यमातून नागरिकांना गंडा घालण्याचे काम सुरू केले होते.

सुमन बँकेत कामाला असल्याचे सांगायची, पण ती मसाज पार्लर व्यवसायाशी निगडित होती. या व्यवसायामुळेच त्याची तिच्याशी ओळख झाली होती. त्यांनतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र तिच्या घरी येताना किंवा जाताना कुणी पाहिले तर परिसरात चर्चा सुरू होईल, अशी भीती दोघांना होती. त्यामुळे त्याने एकाच इमारतीत दोन घरे भाडय़ाने घेतली. या दोन्ही घराचे भाडे तोच भरत होता. त्यापैकी तिसऱ्या मजल्यावर ती तर दुसऱ्या मजल्यावर तो राहत होता. त्याच्या घरी ती त्याला भेटायला जायची. तो तिला लग्नासाठी गळ घालत होता, मात्र ती लग्न करण्यास तयार नव्हती. घटनेच्या दिवशीही सकाळी ती त्याच्याच घरी गेली होती. तिने त्याच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. तसेच तिचे आणखी एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची कुणकुण त्याला लागली होती. यातूनच त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्यात त्याने गळ्यावर वार करून तिचा खून केला. त्यानंतर पिंपात तिचा मृतदेह टाकून घराला कुलूप लावून तो पसार झाला. त्याच्या चौकशीतून सुमनच्या हत्येचा उलगडा झाला आणि या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली.

(या लेखात आरोपी आणि पोलीस वगळता अन्य व्यक्तींची नावे बदलण्यात आली आहेत.)