अत्यावश्यक वस्तूविक्री तसेच खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद असतानाही मंगळवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात काहीसा उत्साह दिसून आला. बाजारात सुरू असलेल्या किराणा मालाच्या दुकानांसह फूलविक्रेते आणि मिठाईच्या दुकानांत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. परिणामी अनेक ठिकाणी करोनारोधक नियमांचे सर्रास उल्लंघन झाले. पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या पथकांनी सकाळी दहानंतर बाजारपेठांत गस्त घालत परिस्थितीवर नियंत्रण आणले. मात्र सकाळच्या सुमारास सर्वच शहरांतील रस्त्यांवर मोठी गर्दी उसळली होती.

जिल्ह््यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून दररोज सरासरी ५ ते ६ हजारांच्या आसपास करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासन सतर्क झाले असून राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करताना दिसत आहेत.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी सरकारने राज्यात सकाळी ८ ते रात्री ८ जमावबंदी तर, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच शुक्रवार रात्री ८ पासून ते सोमवार सकाळी ७ पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. असे असताना ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली. ठाणे शहरातील मुख्य बाजारपठेत शहरातील सर्वच भागातून फुले आणि मिठाई खरेदी करण्यासाठी नागरिक आले होते. सकाळी १० नंतर ठाणे महापालिकेचे पथक तसेच पोलिसांनी तेथील विक्रेत्यांना बाजार बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे दुपारनंतर ठाण्यातील बाजारातील गर्दी ओसरली.

कल्याण- डोंबिवली

शहरातील बाजारात मंगळवारी सकाळी ८ ते सकाळी १०

वाजेच्या सुमारास नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दुपारनंतर महापालिकेचे पथक बाजारात फिरण्यास सुरुवात झाली आणि विक्रेत्यांना दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे दुपारनंतर बाजारात नागरिकांची कमी गर्दी दिसून आली.

कपडे, भांड्यांचीही विक्री

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येपासूनच अंबरनाथ, बदलापुरातील बाजारांत ग्राहकांची गर्दी होत होती. गर्दीचा फायदा घेत अत्यावश्यक दुकानांशिवाय अनेक दुकानदारांनी अर्धे दुकान उघडे ठेवून विक्री केली. यात कपडे, भांडी आणि सजावटीच्या साहित्य दुकानांचा समावेश होता. मंगळवारी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड पाहायला मिळाली. भाजी मंडई, फूल खरेदीची दुकाने गर्दीने भरली होती. या गर्दीमध्ये अंतरनियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. उल्हासनगर शहरातही सोमवारी दुकानदारांनी दुकानाची दारे अर्धवट उघडी ठेवून  वस्तूंची विक्री केली.