News Flash

कलाविष्कार सोहळ्यात शिक्षकांचा स्नेहमेळा

वझे-केळकर महाविद्यालयातील उपक्रम

वझे महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाचे अनेक अभिनव उपक्रम यावर्षी आयोजित करण्यात आले होते. यापैकी हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळा सोहळा हा विशेष कार्यक्रम होता.

वझे-केळकर महाविद्यालयातील उपक्रम
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कलेला वाव देण्यासाठी वझे-केळकर महाविद्यालयात मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाच्या वतीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कलाविष्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार १५ डिसेंबर रोजी केवळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा ‘स्नेहमेळा’ उत्साहात पार पडला.
वझे महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाचे अनेक अभिनव उपक्रम यावर्षी आयोजित करण्यात आले होते. यापैकी हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळा सोहळा हा विशेष कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील काव्यफुलोरा या काव्यवाचन उपक्रमाच्या माध्यमातून मी कोण, मेमो यांसारख्या स्वरचित कविता तसेच ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज यांसारख्या दिग्गज कवींच्या कविता शिक्षकांनी सादर केल्या. लेख अभिवाचन या उपक्रमामध्ये प्रा. डॉ. पानसे यांनी ‘माझी सुपरविजन’ नावाचा स्वयंलिखित विनोदी लेख सादर केला, आसावरी वैद्य यांनी आनंद यादव यांचा ‘झोंबी’ कथेतील काही भाग व गीता काळे यांनी पर्यटनावर आधारित लेख सादर केला. याशिवाय काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ती फुलराणी, वेद वृंदावन या नाटकातील प्रवेश सादर केले. प्राध्यापक अरविंद जाधव यांनी सादर केलेली नादुरुस्त रेडिओतून येणाऱ्या संगीताची नक्कल आकर्षण ठरले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. शर्मा आणि उपप्राचार्या डॉ. शुभांगी भावे, उपप्राचार्य विद्याधर जोशी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

स्पर्धाच्या माध्यमातून पत्रकारितेचे शिक्षण
जोशी-बेडेकर महाविद्यालयात वृत्तलेखन स्पर्धा
हृषीकेश मुळे, युवा वार्ताहर
अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दरवर्षी जोशी-बेडेकर महाविद्यालयात नवरंग महोत्सवाच्या अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीसुद्धा महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी वृत्तलेखन आणि वृत्तनिवेदन या दोन विशेष स्पर्धाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रात लागणाऱ्या कौशल्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसोबत अन्य शाखेतील विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते. वृत्तनिवेदन या स्पर्धेसाठी प्रत्येकी तीन मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. यात स्पर्धकांनी वृत्तनिवेदनासाठी आवश्यक अशी निरनिराळी स्वतंत्र कौशल्ये दाखवली. वृत्तलेखन या स्पर्धेत विद्यार्थ्यांना चालू घडामोडींवर आधारित विषय देऊन सुमारे ९० ते १०० शब्दांत बातमी लिहिण्यास सांगितली. बातमी लिहिण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. विद्यार्थी मोठय़ा संख्येने या स्पर्धेत सहभागी झाले होते. वृत्तलेखन या स्पर्धेत चिन्मयी मेस्त्री-प्रथम क्रमांक, सुप्रिया पार्टे-द्वितीय क्रमांक, योगिता उबाळे -तृतीय क्रमांक या क्रमांकांनी विजयी झाले तसेच वृत्तनिवेदन या स्पर्धेत दिक्षा शेनोय-प्रथम क्रमांक, सोनल सुर्वे-द्वितीय क्रमांक, कृपा पांडे -तृतीय क्रमांक पटकावला.
पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना पुस्तकी अभ्यासक्रमासोबतच प्रत्यक्ष अनुभवावर देखील भर द्यावा असा मार्गदर्शन स्पर्धेचे परीक्षक दीपक सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रज्ञा म्हात्रे यांनी वृत्तनिवेदनासाठी उपयुक्त सूचना विद्यार्थ्यांना दिल्या. नवरंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे हेच उद्दिष्ट या स्पर्धाचे असते, असे मत प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांनी व्यक्त केले. यावेळी नवरंगच्या अध्यक्षा प्रा. संगीता दीक्षित, प्रा. डॉ. स्मिता भिडे, प्रा. मोनिका देशपांडे, प्रा मुग्धा केसकर, प्रा.संतोष राणे, प्रा. गौरी तीरमारे उपस्थित होते.
ब्रेल लिपीच्या आधारे वृत्तनिवेदन
या स्पर्धेत सहभागी झालेल्या कनिष्ठ महविद्यालयातील शिवम पाटील हा अंध विद्यार्थी सहभागी झाला होता. काळाच्या ओघात वृत्तनिवेदनासाठी वापरला जाणारा ‘ठळक बातम्या’ हा शब्द वृत्तनिवेदनात फार क्वचित वापरला जातो. शिवम या अंध विद्यार्थ्यांने मात्र ब्रेल लिपीच्या आधाराने त्या शब्दांची पुनरावृत्ती करत आपल्या विशेष शैलीमध्ये उत्तम वृत्तनिवेदन केले. शिवम पाटील या विद्यार्थ्यांला त्याच्या कौशल्याबद्दल विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

आनंद विश्व गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन
प्रतिनिधी ठाणे
आनंद विश्व गुरुकुल रात्र महाविद्यालयाचे द्वितीयवर्षीय वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात पार पडले. ‘महाराष्ट्राची नृत्यधारा’ या सांस्कृतिक कार्यकमाने स्नेहसंमेलनाला प्रारंभ झाला. वेगवेगळ्या गाण्यांवर आठ नृत्यांचे सादरीकरण महाविद्यालयाच्या बॅफ, बीबीआय व बीएससी, आयटीच्या विद्यार्थ्यांनी केले. यानंतर मान्यवरांचे मनोगत व त्यांच्या हस्ते विद्यर्थ्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले. कार्यकमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुपसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शाहू रसाळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे साहाय्यक पोलीस आयुक्त माधव माळवे, ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक राजन बने, डॉ. राजेश मढवी, बेडेकर विद्यालयाचे माजी प्राचार्य अशोक चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे सीनेट सदस्य महादेव जगताप, अभिनेते हृदयनाथ राणे, कवी नारायण तांबे, ज्येष्ठ नाटय़ निर्माते श्री. गुजर, ज्येष्ठ प्राध्यापिका स्वाती गुर्जर, आनंद विश्व गुरुकुल वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते, गुरुकुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रचार्या डॉ. सीमा हर्डीकर, उपप्राचार्या दीपिका तलाठी, पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वैदेही कोळंबकर कार्यक्रमास उपस्थित होते. या महोत्सवाच्या निमित्ताने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांवर आधारित आवाहन पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचा विद्यार्थी हरीशकुमार प्रजापती याला उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले आणि छाया ढोले या विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. यावेळेस महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आले.

नाटय़कलेचा परिपूर्ण अभ्यास
एन. के. टी. महाविद्यालयात नाटक आणि परिसंवाद
प्रतिनिधी, ठाणे
नाटक ही कला नेमकी काय आहे, नाटक पाहण्याची कारणे, नाटकातील पात्रांना समजून कसे घ्यावे, नाटकातून काय बोध घ्यावा, नाटक निर्मितीची प्रक्रिया पूर्णत्वास कशा प्रकारे पूर्ण होते याविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी एन. के. टी. महाविद्यालयाच्या आर्ट सर्कल विभागातर्फे १४ डिसेंबर आणि १५ डिसेंबर रोजी नाटक आणि परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षितिज कुलकर्णीलिखित ‘चिंब’ या नाटकाचा प्रयोग महाविद्यालयात सादर करण्यात आला.
महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि सध्याचा मराठी रंगभूमीवरील कलाकार क्षितिज कुलकर्णी याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कारखेले आणि प्रा. आरती सामंत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात चिंब या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक क्षितिज कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नाटक या कलाकृतीविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती व आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून नाटकातील प्रत्येक कलाकाराने त्यांनी साकारलेली भूमिका, त्या भूमिकेचे बारकावे, प्रत्येकाच्या भूमिकेचे नाटकातील महत्त्व इत्यादी बाबींवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात चिंब हे नाटक विद्यार्थी आणि प्राध्यापकांसमोर सादर करण्यात आले. नाटकाचा विषय व त्याचे सादरीकरण या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये जागृत झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे नाटकाच्या कलाकारांनी दिली. मराठी नाटकांकडे तरुणाईने जास्तीत जास्त आकर्षित व्हावे, नाटकाचे सादरीकरण, त्यातील बारकावे तसेच विद्यार्थ्यांनी नाटकाचा विषय समजून घ्यावा या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी महाविद्यालयाचा हा उपक्रम तरुणाईमध्ये नक्कीच जागृती व कुतूहल निर्माण करेल असा विश्वास प्रा.आरती सामंत यांनी कार्यक्रमात व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 12:16 am

Web Title: thane cultural events
Next Stories
1 ‘आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी’
2 अवैध नळ जोडण्या तोडल्याचा केवळ दिखावा
3 तन्वी हर्बल आयुर्वेदिक औषधांची सात्त्विक मात्रा
Just Now!
X