पूर्वा साडवीलकर

करोनाकाळात लागू असलेल्या निर्बंधांमुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरातील अनेक हॉटेल, उपाहारगृहे आणि फळांच्या रसाची दुकाने अजूनही बंद आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या फळांच्या घाऊक विक्रीवर त्याचा मोठा परिणाम दिसू लागला आहे. मागील चार महिन्यांत फळांची मागणी ८० टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. यामुळे फळांच्या दरातही घसरण झाली आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने मार्च महिन्यापासून टाळेबंदी जाहीर केली होती. टाळेबंदीच्या काळात हॉटेल, फळांच्या रसाची आणि सॅलडची दुकाने बंद असल्याचा फटका मोठय़ा प्रमाणात फळविक्रीवर झाला. टाळेबंदीच्या काळात वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक किरकोळ विक्रेत्यांना फळांच्या खरेदीसाठी वाशी बाजारात जाणे शक्य होत नव्हते. याच काळात अनेक किरकोळ फळ विक्रेत्यांनीही करोनाच्या भीतीने गाव गाठले. त्यामुळे फळांच्या मागणीत मोठी घट झाली. सध्या टाळेबंदीतून काहीशी शिथिलता मिळत असली तरी मुंबई, ठाण्यातील अनेक हॉटेल, रेल्वे स्थानक परिसरात असलेली सॅलडची दुकाने आणि फळांच्या रसांची दुकाने अजूनही बंद आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातही फळांच्या मागणीत कोणतीही वाढ झाली नसून गेल्या चार महिन्यांमध्ये फळांची मागणी ८० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे फळविक्रीच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून ग्राहक नसल्यामुळे फळांच्या किमतीही घसरल्या असल्याची माहिती फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली. तर, मागणी नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजारात येणाऱ्या फळांच्या गाडय़ांची संख्याही कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून या काळात फळांची मागणी वाढणार असल्याची शक्यता ठाणे शहरातील काही फळविक्रेत्यांनी व्यक्त केली.

किरकोळ बाजारातील फळांचे दर

फळ दर (किलोमागे रुपयांत)

सफरचंद      १४०

केळी             ५०

चिकू              ७०

डाळिंब          १००

अननस        २० ते ४० रु. १ नग

मोसंबी  १२० डझन

संत्री              १२० डझन

टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल होत असली तरीही अद्यापही मुंबई, ठाणे आणि उपनगरातील अनेक हॉटेल, रसाची आणि सॅलडची दुकाने सुरू झालेली नाहीत. तसेच करोनाच्या भीतीमुळेही अनेक नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे फळांच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे.

– संजय पानसरे, फळ व्यापारी