ठाणे जिल्ह्यात मंगळवारी १४३४ जणांना पहिला डोस; ८१३ अनुपस्थित

जिल्ह्य़ातील शहरी तसेच ग्रामीण भागात गेल्या शनिवारी म्हणजेच पहिल्या दिवशी २३ केंद्रांवर १ हजार ८२६ आरोग्य सेवकांना लस देण्यात आली. दरम्यान, मंगळवारी झालेल्या दुसऱ्या फेरीत २३ केंद्रांवर नाव नोंदणी झालेल्या २ हजार २४७ पैकी १ हजार ४३४ आरोग्य सेवकांना लस देण्यात आली. त्याचे प्रमाण ६३.८२ टक्के इतके आहे. उर्वरित ३६.१८ टक्के म्हणजेच ८१३ आरोग्य सेवकांनी लस घेतली नसल्याचे समोर आले आहे. आजारी, गरोदर महिला आणि लस घेताना घाबरणे अशा आरोग्य सेवकांना शासनाच्या नियमावलीनुसार लस दिली जात नसून यामुळेच उर्वरित ८१३ जणांचे लसीकरण झाले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी मोठय़ा उत्साहात करोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी लसीकरणाच्या नाव नोंदणीसाठी असलेल्या अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अनेक आरोग्य सेवकांना लसीकरणाचा संदेश मिळू शकला नव्हता. यामुळे जिल्ह्य़ात शंभर टक्के लसीकरण होऊ शकले नव्हते. त्यानंतर रविवार आणि सोमवार या दोन दिवशी लसीकरण मोहीम थांबविण्यात आली होती. मंगळवारी लसीकरण मोहीम पुन्हा सुरू करताना २३ केंद्रांवर २ हजार २४७ आरोग्य सेवकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र, त्यापैकी १ हजार ४३४ आरोग्य सेवकांनी लस घेतली असून त्याचे प्रमाण ६३.८२ टक्के इतके असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ठाणे महापालिकेच्या ४ केंद्रांवर २३२, कल्याण-डोंबिंवली पालिकेच्या ३ केंद्रांवर २०१, मीरा-भाईंदर पालिकेच्या ३ केंद्रांवर १९४, नवी मुंबई पालिकेच्या ४ केंद्रांवर २३७, भिवंडी पालिकेच्या ३ केंद्रांवर १५८, उल्हासनगर पालिकेच्या १ केंद्रावर ८५, ठाणे ग्रामीणच्या ५ केंद्रांवर ३२७ अशी एकूण १ हजार ४३४ आरोग्यसेवकांना लस देण्यात आली आहे, असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

प्रशासनाचे आवाहन

‘करोना विषाणूला नष्ट करण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे लसीकरण. या लसीकरणामुळे आपला संपूर्ण समाज सुरक्षित होऊ शकतो. यासाठी आपण निश्चित पुढे येणे गरजेचे आहे,’ असे आवाहन ठाणे जिल्हा उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी केले. ‘लसीकरणाच्या दिवशी एखाद्या लाभार्थ्यांला ताप किंवा खोकला असेल तर त्यांना लस देणे शक्य होत नाही. गरोदर महिला आणि इतर व्याधी असलेल्या व्यक्तींनाही लस दिली जात नाही. तसेच लसीकरणादरम्यान अनेकांचा भीतीमुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे ते लस घेत नाहीत. त्यामुळे सद्य:स्थितीला केवळ ७० टक्केच आरोग्य सेवक लस घेण्यास तयार आहेत. तर ३० टक्के आरोग्य सेवकांची अजूनही लस घेण्याची मानसिक तयारी झालेली नाही,’ असेही त्या म्हणाल्या.