करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय; ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

ठाणे : जगभरात फोफावत असलेल्या करोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण राज्यात आढळून आल्यानंतर या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्य़ातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, हॉटेल, मॉल आणि एटीएम केंद्र या ठिकाणी र्निजतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये नागरिकांचा सतत स्पर्श होत असलेल्या सर्वच वस्तूंची दिवसातून दोनदा जंतुरोधक औषधांद्वारे साफसफाई करण्यात येणार असून या कामाचा अहवाल दररोज सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित आस्थापनांसह शासकीय यंत्रणांना दिले आहेत. याशिवाय जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून त्याद्वारे औषध साठेबाजी, मास्कची जास्त दराने विक्री आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून जगभरात करोना विषाणूचा संसर्ग फोफावत असून राज्यामध्येही करोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यासह जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा दक्ष झाल्या असून त्यांनी आता करोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहेत. या कायद्याचाच एक भाग म्हणून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीचा परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्य़ातील रेल्वे स्थानके, बस स्थानके, हॉटेल, मॉल आणि बँकांची एटीएम केंद्रे अशा ठिकाणांचा समावेश असून या सर्वच आस्थापनांसह शासकीय यंत्रणांना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी आदेशाचे परिपत्रक पाठविले आहे.

रेल्वे स्थानक, बस स्थानक, हॉटेल, मॉल अशा ठिकाणी जिन्यालगत असलेल्या लोखंडी रेलिंगला नागरिकांचा स्पर्श होत असतो. त्यामुहे करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचा स्पर्श होत असलेल्या वस्तूंची दिवसातून दोनदा जंतुरोधक औषधांद्वारे साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या साफसफाईच्या कामाचा अहवाल दररोज सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

करोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळल्याच्या अफवांचे वृत्त समाजमाध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून प्रसारित होत असून अशाच प्रकारे गुरुवारी ठाण्यातील एका विद्यार्थ्यांला अशा विषाणूची लागण झाल्याचे वृत्त प्रसारित झाले. यामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अखेर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कोणत्याही विद्यार्थ्यांना अशी लागण झाली नसून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

२४ तास वैद्यकीय पथके कार्यरत

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ात बुधवारपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करण्यात येणार असून ती पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्य़ातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यामुळे अधिक आवश्यकता भासली तर जिल्ह्य़ातील खासगी रुग्णालये, तेथील डॉक्टर आणि यंत्रसामग्री वापरण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला आहेत. त्यासाठी त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर औषधांची साठेबाजी, मास्कची जास्त दराने विक्री तसेच अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात करोना विषाणू संसर्ग झालेला एकही रुग्ण अद्याप अढळलेला नाही. तसेच या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय करोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणाचा परिसर र्निजतुकीकरण करण्याच्या सूचना विविध आस्थापनांसह शासकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

– डॉ. कैलाश पवार, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक