गावकऱ्याचा पुढाकार; गावाबाहेरच्या नागरिकांना आणि फेरीवाल्यांना प्रवेश बंद

ठाणे : करोना विषाणूचा संसर्ग जगभर फोफावत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यतील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड तालुक्यात असणाऱ्या सर्वच गावातील गावकऱ्यांनी पुढाकार घेत गावाच्या वेशी बंद केल्या आहेत. तसेच मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरातून गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना आणि फेरीवाल्यांना गावात प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यतील ग्रामीण भागात अनेक मुंबईकरांनी सेकंड होम म्हणून घेतलेल्या शेतघरांकडे जाणारे रस्तेही गावकऱ्यांनी बंद केले आहेत.

मुंबई आणि ठाणे शहरात आपल्या गावातील एखादा तरूण नोकरीसाठी जाणे ही गावासाठी गौरवाची बाब असते. नोकरीसाठी गावाबाहेर गेलेले तरुण त्यांच्या गावात येणाच्या दिवशी गावात उत्साहाचे वातावरण असायचे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात पसरणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गामुळे ठाणे जिल्ह्यतील गावकऱ्यांनी त्यांच्या गौरवाला आणि भावनेला बाजूला ठेवत आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने केंद्रसरकारकडून देशव्यापी टाळेबंदी जाहीर करण्यात आला आहे. त्यापूर्वीच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे करोना संसर्गाच्या भीतीने ठाणे जिल्ह्यातील शेकडो गावांच्या गावकऱ्यांनी गावाच्या वेशी बंद केल्या आहेत. जिल्ह्यतील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि शहरांपासून अवघ्या काही अंतरावर अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याचा ग्रामीण भाग आहे. या भागातून अनेक ग्रामस्थ नोकरी, धंद्यासाठी बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणे आणि मुंबई तसेच उपनगरात वास्तव्यास आहेत. करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरी भागात संचारबंदी असल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या गावी जाण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहपूर तालुक्यातील गावांनी गावकऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत गावच्या वेशी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यतील पाचही तालुक्यात असणाऱ्या गावाच्या गावकऱ्यांनी आपल्या गावाचे प्रवेशद्वार मिळेल त्या साहित्याने बंद केले आहेत. तसेच गावकऱ्यांनी रस्ता आणि गाव बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठी बंद असल्याचे संदेश गावाच्या प्रवेशद्वारांवर लिहले आहेत. त्यामुळे गाव सोडून शहरात वास्तव्यास गेलेल्या ग्रामस्थांनी कोंडी झाली आहे.

सध्याच्या घडीला गावातील ग्रामस्थांचे आरोग्य महत्वाचे असून करोनाचा संसर्ग रोखणे प्राथमिकता असल्याचे गावचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहेत. करोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी गावकऱ्ऱ्यांनी हा निर्णय घेतला असून गावाबाहेर वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांनी असेल त्याच ठिकाणी काही दिवस राहून सहकार्य करावे, अशी माहिती राहटोली गावचे सरपंच सुखदेव गायकवाड यांनी दिली

जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर

या पाचही तालुक्यातील सर्वच गावांमध्ये करोना विषाणू संसर्गाबाबत ठाणे जिल्हा परिषदेतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच गावांमध्ये राहणारे सर्व नागरिक आरोग्याविषयी जागरुक असून त्यांनी पुढाकार घेऊन गावाच्या वेशी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

– चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद ठाणे