ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश

ठाणे : देशभरातील विविध राज्यांसह महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे समोर आले असतानाच आता समाजमाध्यमे तसेच इतर माध्यमांद्वारे बर्ड फ्लूबाबत चुकीची माहिती देऊन अफवा पसरविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूबाबत अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीवर दिशाभूल किंवा अफवा पसरविली तर संबंधितांवर सायबर गुन्हे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची ताकीद ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

ठाणे शहरात मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन दक्ष झाले आहे. तसेच बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय यंत्रणेची आढावा बैठक घेतली. या बैठकीला ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय धुमाळ, ठाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, उपवनसंरक्षक हिरे यांच्यासह महापालिकांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्य़ात एकूण ७ जलद प्रतिसाद पथके तयार करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी बैठकीत दिले.

पशुवैद्यकीय विभागाबरोबरच ग्रामपंचायत तसेच वन विभाग पातळींवर निगराणीचे आदेशही त्यांनी दिले. जिल्ह्य़ात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील, त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी वन विभागाला या वेळी दिल्या. ठाणे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन शासनाच्या निर्देशांप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणारे पक्षी मृतावस्थेत आढळून आले तर तात्काळ माहिती द्यावी. तसेच व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आले तर तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी. त्याचबरोबर जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२५६०३३११ तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित दूरध्वनी करून माहिती कळवावी. नागरिकांनी मृत पक्ष्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे, तसेच जनतेने घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कल्याणमध्ये दोन खारमिला पक्षी मृतावस्थेत

कल्याण : पश्चिमेतील गौरीपाडा भागातील प्रस्तावित सिटी पार्कच्या परिसरात मंगळवारी दोन खारमिला (ढोकरी) पक्षी मृतावस्थेत आढळून आले असून या दोन्ही पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू की अन्य कारणांमुळे झाला आहे, याबाबत अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत ठाणे आणि कल्याणमधील पशुवैद्यकीय विभागाला पालिका आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

गौरीपाडा भागात दलदल, पाणथळ जमीन आहे. या भागात कीटक, पानकिडे खाण्यासाठी विविध प्रकारचे पक्षी येतात. याच भागातून स्थानिक रहिवासी शैलेश भोईर आणि प्रदीप भोईर हे जात होते. त्या वेळेस त्यांना दोन खारमिला पक्षी गुरआत्मन सोसायटीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आले. याबाबत त्यांनी स्थानिक नगरसेवक  दया गायकवाड यांना माहिती दिली. त्यानंतर गायकवाड यांनी माहिती देताच पालिका आरोग्य विभागाने दोन कर्मचारी पाठवून त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी केली. या संदर्भात पालिका साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्याशी संपर्क साधला असता, गौरीपाडा भागात दोन खारमिला पक्षी मृतावस्थेत आढळले असून त्याची माहिती तातडीने कल्याण, ठाणेमधील पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आली. हे पक्षी नेमके कशामुळे मरण पावले आहेत, याचे कारण अद्याप समजू शकले नसून तपासणीनंतर मृत्यूचे कारण समजू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या इकोड्राइव्ह यंगस्टर फाऊंडेशनने पालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्ष्यांसाठी कल्याण, डोंबिवलीत दफनभूमी तयार करण्याची मागणी केली आहे.