ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांचे मत

जल तसेच कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यच्या ग्रामीण व शहरी भागांत विविध योजना राबवून तेथील नागरिकांना सोयीसुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे. कल्याण-डोंबिवलीकडेही आमचे लक्ष असून महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना कायम सहकार्य राहिले आह, अशी ग्वाही ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुभेदारवाडा कट्टय़ावर शनिवारी झालेल्या कार्यक्रमात दिली.

कल्याणमधील सुभेदारवाडा कट्टय़ावर शनिवारी संध्याकाळी अश्विनी जोशी आणि त्यांचे पती आशुतोष पंडित यांची मुलाखतीला कार्यक्रम रंगला. पत्रकार मिलींद भागवत यांनी त्यांना बोलते केले. ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात काही चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागासाठी नेमके काय प्रयत्न आहेत या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कृषी तसेच जल पर्यटन, साहसी खेळ, कांदळवनासारखे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न सुरु आहेत. भिवंडी तालुक्यातील आलीमघर येथे कायमस्वरुपी जल पर्यटन, कांदळवन प्रकल्प उभारण्याच्या प्रकल्पाची आखणी सुरु आहे. शहापूर – मुरबाड येथे कृषी पर्यटन तसेच माहुली गडावर साहसी खेळांची तरतूद करण्याची योजना आहे. पाण्याची गरज पहाता १०० च्या आसपास वनराई बंधारे उभारण्यास प्राधान्य दिले आहे.अशा अनेक योजना असून त्या पूर्णत राबविण्याचा माझा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारी नियमांच्या चौकटीत राहून काम केले तर त्याचा समाजाला पूर्ण लाभ मिळतो. परंतु यात सर्वानाच समान वागणूक देण्यात येत असल्याने काहीजण या नियमांना नाव ठेवतात. नियमात काम करायला कोणाच्या दडपणाची आवश्यकता नाही, असे जर प्रत्येकाने ठरविले तर कोणत्याही अधिकाऱ्याला दडपण येणार नाही, असे त्या म्हणाल्या. रेती उपशाविरोधात कारवाईविषयी त्या म्हणाल्या, अधिकारी हा अधिकारी असतो, तो महिला की पुरुष असे मानायचे नसते. कारवाई करण्याचे माझे वेगळे तंत्र आहे,  असे त्यांनी सांगितले.