जादा बिलांमुळे ठाणे, पालघर जिल्ह्यांतील अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा मोठा फटका या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संगणकीय शिक्षणाला बसत आहे. वीज नसल्यामुळे ग्रामीण भागांतील शाळांतील संगणक धूळ खात पडले आहेत, तर लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या ‘डिजिटल शाळां’नाही वीज बिलाची रक्कम डोईजड होऊ लागली आहे. सामान्य शाळांना अडीच हजारांहून अधिक, तर डिजिटल शाळांना चक्क नऊ हजारांहून अधिक बिल येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
आजच्या आधुनिक काळातील शिक्षण सर्वच स्थरांतील शालेय विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे, त्यासाठी खाजगी डिजिटल शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळांमध्ये लोकसहभागातून डिजिटल शाळांची निर्मिती करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्य़ात सुमारे ४० हून अधिक डिजिटल शाळांची निर्मिती झाली असून त्या माध्यमातून संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या शाळांना व्यापारी दरानुसार वीज बिलापोटी सामान्य बिलापेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागत असल्याने या डिजिटल शाळा जास्त दिवस चालवणे अशक्य होत आहे. अनेक शाळांचे वीज बिल थकल्यामुळे तेथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर वीज असलेल्या शाळांत बिल जास्त येण्याच्या भीतीने विजेचा वापरच होताना दिसत नाही. त्यामुळे येथील संगणकीय शिक्षण पूर्णपणे थंडावले आहे.
शासकीय शाळांना व्यावसायिक दराने होणारा वीजपुरवठा अत्यंत अन्यायकारक असून त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण देताच येत नाही. सरकारकडून आलेले संगणक वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे केंद्र शाळांमध्ये पडून आहेत. लोकसहभागातून डिजिटल शाळा उघडण्यात आल्या असल्या तरी सध्या नव्या उत्साहात शिक्षक आणि गावकरी वीज बिल भरत आहेत. मात्र सातत्याने ९ हजारांचा टप्पा उलटत राहिल्यास डिजिटल शाळा चालवणे अवघड होऊन बसणार आहे. त्यामुळे ‘संगणक नको तर आधी वीज बिल कमी करा’ अशी विनवणी राज्य शासनाकडे करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे किरण काटे यांनी दिली.
श्रीकांत सावंत, ठाणे

ठाणे जिल्ह्यतील डिजिटल शाळा
शहापूर – २५
कल्याण – ३
अंबरनाथ -४
भिवंडी – ३
मुरबाड -३