ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमध्ये धोकादायक इमारती कोसळून मोठय़ा दुर्घटना घडत असताना ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला गेल्या काही दिवसांपासून प्रमुख अधिकारीच उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख डॉ. जयदीप विसावे यांनी काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर अद्याप दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक जिल्हा प्रशासनाने केलेली नाही.
ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमधील धोकादायक इमारतींची संख्या आणि दुर्घटनेचा आलेखही वाढत आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर शहरांतील धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता असते. इमारत कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना वाचविण्याचे सुखरूप बाहेर काढण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभाग करत असतो. या विभागाच्या प्रमुखावर आपत्ती निवारणाची जबाबदारी असते. असे असतानाच ऐन पावसाळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कक्षप्रमुख डॉ. जयदीप विसावे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला. मात्र, त्यांच्या जागी तातडीने कोणाचीही नियुक्ती न झाल्याने आपत्ती व्यवस्थापन विभाग नेतृत्वहीन झाल्याचे चित्र आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षप्रमुख या पदावर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नसल्याने या पदावर करार पद्धतीने अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. त्यामुळेच जिल्हा प्रशासनावर ही वेळ आल्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात, डॉ. विसावे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. तसेच कक्षप्रमुख या पदावर करार पद्धतीने काम करीत होतो, मात्र परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्याने हा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.