दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांची वणवण; प्रशासनाचे नियोजन नसल्याचा फटका

ठाणे : जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून कोव्हॅक्सिन लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातूनच कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेणारे ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या मात्रेसाठी वणवण फिरत असून त्यानंतरही त्यांना लस मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच दुसऱ्या मात्रेची कालमर्यादा संपत आल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाले आहेत. तसेच जिल्ह्य़ातील ज्या केंद्रांवर ही लस उपलब्ध आहे, तिथे शासनाच्या आदेशानुसार केवळ १८ ते ४४ वयोगटातील पूर्वनोंदणी करणाऱ्यांना लस दिली जात आहे. या नियोजन गोंधळामुळे ज्येष्ठांचे हाल होत असून त्यांची अस्वस्थता वाढू लागली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून लशीचा तुटवडा निर्माण होऊ लागला असून यातूनच जिल्ह्य़ातील अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत. त्यामध्ये कोव्हॅक्सिन लशींचा सर्वाधिक तुटवडा जाणवत आहे. गेल्या आठवडय़ात या लशीचा साठाच उपलब्ध नव्हता. त्यातच केंद्र आणि राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाच बुधवारी जिल्ह्य़ाला ३२ हजार कोव्हॅक्सिन लशींचा साठा उपलब्ध झाला. पण केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी हा साठा राखून ठेवण्यात आला आहे. यातूनच महिनाभरापूर्वी कोव्हॅक्सिनची मात्रा घेणाऱ्यांना दुसरी मात्रा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच दुसऱ्या मात्रेची कालमर्यादा संपत आली आहे. तर काहींची कालमर्यादाही संपून गेली आहे. यामुळे हवालदिल झालेले ज्येष्ठ नागरिक ज्या केंद्रावर ही लस उपलब्ध आहे, त्याठिकाणी रात्री किंवा पहाटेपासूनच रांगा लावून गर्दी करत आहेत. असाच प्रकार गुरुवारी जिल्हा रुग्णालयाबाहेर दिसून आला. लस मिळत नसल्यामुळे ज्येष्ठांची अस्वस्थता वाढू लागली असून ते नियोजनाविषयी संताप व्यक्त करू लागले आहेत.

 

कोव्हॅक्सिन लसीकरण

शहर          पहिली मात्रा     दुसरी मात्रा      एकूण

ठाणे ग्रामीण     ४६१७         ४२३२         ८८४९

ठाणे          ३२१९४        ६०७७         ३८२७१

मीरा-भाईंदर     ८६९५         ५७२५         १४४२०

नवी मुंबई      १७११७        १३७७६        ३०८९३

उल्हासनगर     १३८४         २२३          १६०७

भिवंडी        १४६          २८           १७४

कल्याण-डोंबिवली ११८१०        ७०५०         १८८६०

एकूण         ७५९६३        ३७१११        ११३०७४

 

कोव्हॅक्सिन दुसरी मात्रा शिल्लक असलेले नागरिक

शहर                   नागरिक

ठाणे ग्रामीण            ३८५

ठाणे                    २६,११७

मीरा-भाईंदर            २९७०

नवी मुंबई                ३३४१

उल्हासनगर            ११६१

भिवंडी                     ११८

कल्याण-डोंबिवली       ४७६०

एकूण                 ३८,८५२

कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेऊन दोन महिने उलटून गेले आहेत, तरीही दुसरी मात्रा मिळत नाही. त्यासाठी दररोज रुग्णालयाच्या फेऱ्या मारत आहोत. परंतु लस उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा घरी जावे लागते. पायाला दुखापत झालेली असतानाही दररोज सकाळी लवकर केंद्रांवर रांग लावावी लागत आहे, तरीही लस मिळत नाही. 

– अनुसया कांबळे, ज्येष्ठ नागरिक

आगामी काळात केवळ १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिनचाच डोस देणे निश्चित केले, तर ४५ वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता चार दिवसांपूर्वीच वर्तविली होती. हे चित्र आज प्रत्यक्षात जिल्हा रुग्णालय परिसरात दिसून आले. त्यामुळे कोव्हॅक्सिनची लस आधी दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्याने द्यावी.

– नरेश म्हस्के, महापौर, ठाणे</strong>