दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य; ४४ वर्षांखालील नागरिकांचे लसीकरण एकाच केंद्रावर

ठाणे : जिल्ह्य़ात अपुऱ्या लशींच्या साठय़ामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक केंद्रे बंद ठेवावी लागली असतानाच बुधवारी सकाळी जिल्ह्याला लशींचा नवीन साठा उपलब्ध झाला. मात्र दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे ठाणे महापालिकेने २८ पैकी २७ केंद्रे दुसऱ्या मात्रेसाठीच खुली ठेवली होती. तर उर्वरित एका केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील पूर्वनोंदणी करणाऱ्या नागरिकांनाच लस देण्यात येत होती. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, उल्हासनगर याठिकाणीही मोजकीच केंद्र सुरू होती. तर अंबरनाथमध्ये मात्र केंद्र बंदच होती. यामुळे या सर्वच केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती कायम होती.

ठाणे जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून लशींचा तुटवडा जाणवत आहे. यातून जिल्ह्य़ातील अनेक केंद्रे गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. तसेच लशींचा नवीन साठा उपलब्ध होत नसल्यामुळे ही केंद्रेही बंद होण्याच्या मार्गावर होती. मात्र, बुधवारी सकाळी जिल्ह्य़ाला ७० हजार ४०० लशींचा साठा उपलब्ध झाला. यामध्ये ३८ हजार ४०० कोविशिल्ड आणि ३२ हजार कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्य़ातील पालिका आणि ग्रामीण भागातील केंद्रांवर दुपारनंतर लसीकरण सुरू झाले. मात्र, साठा पुरेसा नसल्यामुळे पालिकांनी ठराविक केंद्रच सुरू ठेवल्याने याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ठाणे महापालिका क्षेत्रात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यापैकी अनेकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा संपत आली आहे. त्यामुळे असे नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने २८ पैकी २७ केंद्र दुसऱ्या डोससाठीच खुली ठेवली होती. तर उर्वरित एका केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील पूर्वनोंदणी करणाऱ्या नागरिकांनाच लस देण्यात येत होती.

कल्याण-डोंबिवली शहरातील लसीकरण केंद्रांवर बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या. शहरात १७ लसीकरण केंद्रे असून यापैकी १४ केद्रांवर कोविशिल्ड लस देण्यात येत होती. तर १८ ते ४४ वयोगटातील पूर्वनोंदणी करणाऱ्यांनाच लस दिली जात होती. दोन केंद्रांवर केवळ कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येत होता. उल्हासनगरमध्ये तीन केंद्रांवर लसीकरण सुरु होते. यापैकी दोन केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला आणि दुसरा लशीचा डोस देण्यात येत होता. तर एका केंद्रावर केवळ १८ ते ४४ वयोगटातील पूर्वनोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्यात येत होती. अंबरनाथ शहरातील दोन्ही केंद्र मात्र बुधवारी बंद ठेवण्यात आली होती. या केंद्रांवर गुरूवारपासून लसीकरण सुरू करण्यात येणार असून एका केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना तर दुसऱ्या केंद्रावर ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. बदलापूर शहरात  बुधवारी दुपारनंतर लसीकरणास सुरुवात झाली. या केंद्रावर कोविशिल्ड लशीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येत होता. ठाणे ग्रामीणमध्ये चार लसीकरण केंद्रांवर बुधवारी लसीकरण सुरू होते. तीन केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील तर एका केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत होती.

तरुणांमध्ये नाराजीचा सूर

ठाणे जिल्ह्य़ातील अनेक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील पूर्वनोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस देण्यात येते. मात्र केंद्र कमी असल्यामुळे पूर्वनोंदणी काही वेळातच पूर्ण झाल्याचे दाखविण्यात येते. त्यामुळे लसीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

जिल्ह्य़ातील नवीन लशींचा साठा

शहर             कोविशिल्ड           कोव्हॅक्सिन      एकूण

ठाणे                   ७५००              ७०००            १४,५००

कल्याण-डोंबिवली ५९००              ६०००         ११,९००

नवी मुंबई           ९०००              ५०००         १४,०००

मीरा-भाईंदर       ७०००             ३०००           १०,०००

भिवंडी             १०००             २५००              ३५००

उल्हासनगर     १५००             १५००              ३०००

ठाणे ग्रामीण     ६५००             ७०००             १३,५००

एकूण             ३८,४००           ३२,०००          ७०,४००