News Flash

Corona : ठाणे जिल्हा रुग्णालय बनले ‘जीवनदायी’!

तीन हिमोग्लोबिन असलेल्या करोना पॉझिटिव्ह आदिवासी गर्भवतीची सुखरूप सुटका....

संदीप आचार्य

विक्रमगडची आदिवासी महिला शांताचं हिमोग्लोबिन अवघे तीन झाले होते. तशातच ती करोना पॉझिटिव्ह निघाल्याने बाळंतपण कसं पार पडणार ही चिंता होती…ठाणे जिल्ह्यातील मोखाड्याच्या डॉक्टरांनी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना दूरध्वनी करून माहिती देताच त्यांनी तात्काळ शांताला जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यास सांगितले. शांता येताच डॉक्टरांनी पटापट उपचार सुरु केले. रक्त चढवून प्रथम हिमोग्लोबिन वाढवले. करोनाचे उपचार सुरु ठेवत तिचे बाळंतपणही सुखरुप पार पाडले…. गेल्या वर्षभरात जवळपास १०१ करोनाबाधित महिलांची बाळंतपणं सुखरूपपणे ठाणे जिल्हा रुग्णालयात पार पडली आहेत.

काही चिंता करू नको, मी बघतो… तुम्ही रुग्णाला लगेच ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवून द्या… जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांचे शब्द शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आश्वस्त करून जातात. करोनाच्या गेल्या वर्षभरात येथील डॉक्टर, परिचारिका तसेच वॉर्डबॉय पासून कोणीच घड्याळाचे काटे पाहिले नाहीत की जेवण्या खाण्याची तमा बाळगली. याला कारण स्वत: जिल्हा शल्यचिकित्सक दिवसरात्र रुग्ण सेवेसाठी उभे आहेत. शांतासरख्या अनेक महिलांची सुखरूप सुटका या रुग्णालयाने केली. यात २३ सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. १०५ नवजात बालकांची सर्वार्थाने काळजी घेतली गेली. यातील सर्वच आज आपल्या घरी सुखरूप आहेत.

एकीकडे करोनाच्या रुग्णांवर उपचार तर दुसरीकडे कोणत्याच सामान्य रुग्णाला नाकारायचे नाही ही भूमिका. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. आमच्या अनेक डॉक्टर व कर्मचाऱ्यांना करोना झाला. परंतु बरे होताच ही सर्व मंडळी नव्या जिद्दीने पुन्हा कामाला लागल्याचे सांगताना एक अभिमान डॉ. कैलास पवार यांच्या चेहेऱ्यावर दिसत होता. करोनाच्या वर्षभरात जवळपास ५१३७ करोना रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले. यात ठाणे जिल्ह्यात मजुरी करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यातील लोकांचा समावेश मोठ्या संख्येने आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थानपासून झारखंड पर्यंतच्या नागरिकांवर उपचार करण्यात आले. महत्वाचे म्हणजे याच काळात मुंबईत बेड न मिळालेल्या तब्बल १५३ करोना रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

२०० बेडच्या या रुग्णालयात आज रुग्णांची उपचारांसाठी गर्दी झाली आहे. रुग्ण बेडवर आहे तशी जमिनीवरही गादी घालून व्यवस्था केलेली दिसते. याबाबत डॉ. पवार म्हणाले, आम्ही एकाही रुग्णाला नाकारत नाही. इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे. एकवेळ अतिदक्षता विभागात बेड मिळणार नाहीत. व्हेंटिलेटर उपलब्ध होणार नाही पण ऑक्सिजन देऊन प्रत्येक रुग्णाचा जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न आमचे डॉक्टर करतात. जवळपास १४८ रुग्णांना डायलिसीस सेवाही येथे दिली जाते. ठाणे तुरुंगातील १०० हून अधिक करोना बाधित कैद्यांवर जसे उपचार केले तसेच ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील ५७ मनोरुग्णांवरही उपचार करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य विभागाच्या बहुतेक रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे थांबलेले असताना ठाणे जिल्हा रुग्णालयात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. शुभांगी आंबाडेकर व डॉ. प्रसन्न देशमुख यांनी तब्बल १८१ हून अधिक रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. डॉ. प्रसाद भंडारी, डॉ. विलास साळवे, डॉ. प्रियांका महांगडे, डॉ. रुची कुलकर्णी, डॉ. नेताजी मुळीक, डॉ. अर्चना आखाडे, डॉ. सचिन घोलप, डॉ. श्रीजीत शिंदे, डॉ. अशोक कांबळे , डॉ. अर्चना पवार तसेच मेट्रन प्रतिभा बाबू व वर्षा नलावडे यांच्यासह सर्वजण पडेल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडतात,असे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार; २० हजाराला एका इंजेक्शनची सुरु होती विक्री

करोनाचा काळ हा तसा सर्वांसाठीच कठीण असला तरी ठाणे जिल्ह्यात याचे आव्हान मोठे होते. जिल्ह्यात नऊ महापालिका असूनही आरोग्य यंत्रणा यथातथाच आहे. त्यातही करोना बाधित गर्भवती महिलांचे बाळंतपण करण्यास करोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील मोठ मोठी रुग्णालये धजावत नव्हती तिथे ठाणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची स्थिती काय असेल ती कल्पना करू शकतो. त्यातही दुर्गम आदिवासी तसेच ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचे खूपच हाल झाले. अशा महिलांसाठी आशेचा किरण ठरले ते आरोग्य विभागाचे ठाणे जिल्हा रुग्णालय… असेच चित्र आरोग्य विभागाच्या राज्यातील बहुतेक जिल्हा रुग्णालयात पाहावयास मिळते. ठाणे जिल्हा रुग्णालयात येत्या काही दिवसात ५० नवीन बेडची व्यवस्था केली जाणार असून एकीकडे करोना रुग्णांवरील उपचार तर दुसरीकडे लसीकरणाचे काम असे दुहेरी आव्हान ठाणे जिल्हा रुग्णालयाला पेलावे लागत आहे. त्यातही शासकीय रुग्णालय असल्याने प्राधान्याने लसीकरण व्हावे यासाठी व्हिआयपींचा मोठा राबता या रुग्णालयात दिसून येतो. गोरगरीब रुग्णांपासून ते लसीकरणासाठी आलेल्या व्हिआयपींना सांभाळत आपल्या तुटपुंज्या फौजेनिशी डॉ. कैलास पवार निकराची लढाई करताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 5:51 pm

Web Title: thane district hospital civil surgeon working amid corona case rise in maharashtra pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 चार मृत्यूंनी ठाणे हादरले!
2 लसीकरण केंद्रांवर रांगा
3 ठाणे शहरातील रुग्णसंख्या स्थिर
Just Now!
X