लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्य़ात १ ते ११ मार्च या कालावधीत ८ हजार २१३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा एकूण आकडा २ लाख ७३ हजार १३० झाला असून त्यापैकी २ लाख ५८ हजार ७१८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ात सध्या ८ हजार ९१ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ६ हजार ३२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या ११ दिवसांत ३ हजार ते ३ हजार ५०० होती. मात्र, गेल्या काही दिवसांत दररोजच्या रुग्णवाढीचे प्रमाण दुप्पट झाल्याने आता प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

संपूर्ण राज्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असताना आता ठाणे जिल्ह्य़ातही चिंताजनक बाब समोर आली आहे. १ ते ११ मार्च या कालावधीत ८ हजार २१३ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत, तर ४४ जणांचा मृत्यू झालेला आहे. दिवसाला सरासरी आता ७०० ते ९०० रुग्ण आढळून येत आहेत. यामध्येही कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या ११ दिवसांच्या कालावधीतील ८ हजार २१३ करोना रुग्णांपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात २ हजार २४२ करोनाबाधित, तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २ हजार ५८० करोनाबाधित आढळून आले आहेत, तर ४४ मृतांपैकी ठाण्यात १७ आणि कल्याण डोंबिवली क्षेत्रात नऊ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. ही दोन्ही शहरे करोनाची केंद्रे आढळून येत असली तरी जिल्ह्य़ातील इतर भागांतही करोनाचा आकडा वाढू लागला आहे. दोन महिन्यांपूर्वी दिवसाला सरासरी २५० ते ३५० करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते.