उपाहारगृहे, व्यायामशाळा, केश कर्तनालये, खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने

बदलापूर / कल्याण : ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे शहर आणि नवी मुंबई वगळता कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगरपरिषद, शहापूर आणि मुरबाड नगर पंचायत तसेच ग्रामीण क्षेत्राला तिसऱ्या स्तरातील शिथिलतेची मुभा मिळाली आहे.

तिसऱ्या स्तराप्रमाणे या भागातील निर्बंध शिथिल होणार असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. हे निर्बंध शिथिलतेचे आदेश १३ जूनपर्यंत लागू राहणार आहेत.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी निर्बंध शिथिल करण्याचे आदेश रविवारी  जारी केले. त्यानुसार या सर्वच भागांत अत्यावश्यक वस्तूसह इतर आस्थापना सोमवार ते शुक्रवार दुपारी  ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर, उपाहारगृहे, व्यायामशाळा, केशकर्तनालये, खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. मॉल्स, सिनेमागृहे, नाटय़गृहे बंदच राहणार आहेत. उपाहारगृहे सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. दुपारी ४ नंतर तसेच शनिवारी आणि रविवारी केवळ पार्सल सुविधा आणि घरपोच सेवा सुरू राहील.

सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे, सायकलिंग करण्यासाठी दररोज सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मुभा आहे.

शासकीय कार्यालयांसह परवानगी असलेली खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीत दुपारी  ४ र्पय सुरू ठेवता येतील. मैदानी खेळांना सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ९पर्यंत परवानगी असेल. चित्रिकरणासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी आहे. सामाजिक मेळावे, सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने आयोजित करता येतील. लग्न समारंभांसाठी ५० लोकांच्या तर अंत्यसंस्कार विधी २० लोकांच्या उपस्थितीत करता येईल. बैठका, स्थानिक सहकारी संस्थांच्या निवडणुका सभागृहाच्या ५० टक्के बैठक क्षमतेने घेता येतील.  ई—कॉमर्स साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील. जमावबंदी सांयकाळी ५ वाजेपर्यंत तर संचारबंदी सायंकाळी ५ वाजल्यानंतर लागू राहील. सार्वजनिक परिवहन सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत मुंबई महापालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.

उत्पादनाबाबत..

उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या लघु, मध्यम आणि सुक्ष्म प्रकल्प नियमितपणे सुरू राहतील.

नव्या आदेशात काय?

* राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन सुरू राहील.

*अत्यावश्यक ,गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

* उत्पादन सेक्टरमधील इतर सर्व उत्पादन घटक ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.

* हे आदेश सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून १३ जून रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.