कोकण विभागातून वर्षभरात ६ कोटींचा गुटखा जप्त; वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर

ठाणे : आरोग्यास हानिकारक असल्याने गुटखा विक्रीवर शासनाने बंदी आणली असली, तरी गेल्या आर्थिक वर्षांत अन्न आणि औषध प्रशासनाने फक्त कोकण विभागातून तब्बल ६ कोटी १ लाख १० हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. त्यातही गुटखा विक्रीत ठाणे जिल्हा आघाडीवर असून रेल्वेतून मोठय़ा प्रमाणात गुटख्याची वाहतूक आणि विक्री होत असल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्रात प्रामुख्याने कर्नाटक आणि गुजरातमधून गुटखा विक्रीसाठी आणला जातो. कर्नाटकातून येणारा गुटखा पुणे मार्गे तर गुजरातमधून येणारा गुटखा पालघरमधून येतो. त्यासाठी रेल्वेचा वापर होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाई केल्यास गुटख्याचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव रोखता येऊ शकेल, असे अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र रेल्वे मार्गे होणारी अवैध गुटख्याची वाहतूक कशी रोखायची, हा मोठा प्रश्न आहे.

२० जुलै २०१२ रोजी शासनाने गुटख्यावर बंदी घातली. दरवर्षी ही बंदी एका वर्षांने वाढविली जाते. असे असले तरी अवैधपणे गुटखा विक्री आणि वाहतुकीवर अद्यापही अन्न व औषध प्रशासनाला लगाम घालता आला नाही. २०१७-२०१८ या वर्षांत १२७ प्रकरणात ६ कोटी १ लाख १० हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी फक्त ३६ खटले दाखल झाले असून उर्वरित प्रकरणात खटले दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी सुरेश देशमुख यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. विशेष म्हणजे या वर्षांतील सर्वात मोठी कारवाई भिवंडी येथे झाली असून एकूण २ कोटी रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे.  वसई येथून १ कोटी ४० लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाचे अन्न आणि औषध विभागाचे अधिकारी वेगळे असल्याने रेल्वेच्या हद्दीत कारवाई करता येत नसल्याचे सांगून गुटखा वाहतूक रेल्वे मार्गे अधिक होत असल्याचेही त्यांनी यावेळी  सांगितले. अवैधरीत्या गुटखा बनविणे, विक्री करणे, वाहतूक करणे यामध्ये नेमका कोणाचा हात आहे, याचा मागोवा मात्र पोलिसांनाही घेता आला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

२० कोटींचा गुटखा नष्ट

* २०१७-२०१८ या वर्षी ठाणे येथून ८६ ठिकाणांहून गुटखा जप्त करण्यात आला.

* रायगडमधील ३१ ठिकाणी, रत्नागिरीत ३ ठिकाणी, तर सिंधुदुर्गातून ७ ठिकाणी गुटख्यावर कारवाई करण्यात आली आहे.

* जुलै २०१२ पासून २३ कोटी ९५ लाख ९९ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

* त्यापैकी १९ कोटी ९० लाखांचा गुटखा नष्ट करण्यात आला असून २०१२-१३-१४ या तीन वर्षांत जवळपास १८ ट्रक गुटखा पुणे येथील रोकम इंडस्ट्री येथे नष्ट करण्यात आला होता.

* सध्या मात्र गुटखा त्या त्या परिसरातील कचराभूमीवर नष्ट करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.