27 January 2021

News Flash

जिल्हा हिवताप निर्मूलन विभाग नव्या सुसज्ज जागेच्या प्रतीक्षेत

स्वच्छतागृह नसल्याने महिला कर्मचाऱ्यांचीही कुचंबणा

(संग्रहित छायाचित्र)

स्वच्छतागृह नसल्याने महिला कर्मचाऱ्यांचीही कुचंबणा

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन गेल्या चार महिन्यांपासून कोटय़वधी रुपये खर्चून करोना रुग्णांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्यात व्यग्र असताना जिल्ह्य़ातील साथरोग नियंत्रणाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाणाऱ्या हिवताप निर्मूलन विभागाच्या कार्यालयाची मात्र दुर्दशा झाल्याचे चित्र अजूनही कायम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या तीन खोल्यांच्या कौलारू कार्यालयातून हिवताप साथरोग नियंत्रणाचे काम चालते. या कार्यालयास पावसाळ्यात मोठी गळती लागली असून दस्तावेज ठेवण्यास जागा नसणे, महिलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव, अशा अनेक समस्यांनी येथील व्यवस्था मोडकळीस आली आहे.

या कार्यालयाचे नव्या जागेत स्थलांतर केले जावे, असा प्रस्ताव राज्य शासनाला स्थानिक प्रशासनाने खूप वर्षांपूर्वी दिला आहे. सरकार स्तरावर याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. करोनाच्या काळात सरकार आणि स्थानिक प्रशासन आरोग्य व्यवस्थेवर कोटय़वधी रुपयांचा खर्च करत असताना या कार्यालयाला वाली मिळावा, अशी आशा येथील अधिकारी आणि कर्मचारी बाळगून आहेत. जिल्ह्य़ातील हिवताप निर्मूलन, साथरोग जनजागृती आणि सर्वेक्षण अशी विविध कामे या विभागामार्फत केली जातात. करोना काळात या विभागाच्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या आहेत. या कार्यालयात सध्या १८ ते २० कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेप्रमाणे हा विभागही प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या या कार्यालयात महिलांसाठी साधे स्वच्छतागृह नसल्याने या कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ट्रेझरी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागते. कार्यालयात जागा अपुरी असल्यामुळे येथील दस्तावेज ठेवण्यासही मोठी अडचण होते.  पावसाळ्यात या कार्यालयाचे छत गळत असल्यामुळे दस्तावेज भिजतात. जोरदार पावसामुळे कार्यालयात अनेकदा पाणी साठते.

एमटीएनएल कार्यालयातील जागेसाठी पाठपुरवा

करोना काळामध्ये हिवताप विभागाचे कामकाज वाढले असून या कार्यालयाला सुसज्ज जागा मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये शहरातील एमएटीएनएल कार्यालयात असलेल्या जागेची मागणी करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्हा हिवताप निर्मुलन अधिकारी डॉ. महेश नगरे यांनी दिली. मात्र, शासनाकडून नव्या जागेसाठी कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे  हे काम रखडले असून येत्या महिनाभरात निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही डॉ.नगरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 3:39 am

Web Title: thane district malaria eradication department awaits for new equipped space
Next Stories
1 मालमत्ता कर, पाणीपट्टी माफ करण्याचा आग्रह
2 भिवंडीत जमिनीच्या वादातून गोळीबार
3 श्रीदेवी कोविड रुग्णालयाचा परवाना रद्द
Just Now!
X