१७ दिवसांत ४३४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

निवडणुकीच्या कालावधीत राजकीय नेत्यांकडून गुंडापुंडांचा गैरवापर होऊ नये, तसेच आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. अवघ्या १७ दिवसांत पोलिसांनी ४३४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. तर ७११ जणांकडून हमीपत्रे लिहून घेण्यात आली आहेत. यासोबतच २३ शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असून अनेक तडीपार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या कालावधीत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून संपूर्ण राज्यात पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत. यात ठाणे पोलिसांनीही आता कारवाईला वेग आणला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी येथील शहरी भाग येतो. निवडणुकीच्या कालावधीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून २१ सप्टेंबर रोजी आचारसहिंता लागू झाल्यापासूनच ठाणे शहर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

यात पोलिसांनी ४३४ जणांविरोधात प्रतिबंधात्मक नोटिसा धाडल्या आहेत, तर ७११ जणांकडून निवडणुकांच्या कालावधीत अनुचित प्रकार करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. या गुन्हेगारांनी कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांची रवानगी न्यायालयात करण्यात येणार आहे. यासह या गुन्हेगारांकडून जामिनाची रक्कमही बॉण्ड लिहून घेताना घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुकांच्या काळात अवैध मद्याचा साठाही पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात जप्त केला आहे.

पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध मद्यसाठय़ाच्या१४८ कारवाया करण्यात आल्या आहेत. तर २३ शस्त्रास्त्रेही पोलिसांनी या कालावधीत जप्त केली असून  यात १० गावठी कट्टय़ांचा समावेश आहे.

फरार आणि तडीपारांवरही कारवाई

ठाणे पोलिसांनी मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्य़ांतून तडीपार असलेल्या आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वावरणाऱ्या तडीपारांचाही शोध सुरू केलेला आहे. शांतीनगर पोलिसांनी इमरान अन्सारी (२५), खंडणीविरोधी पथकाने संदीप उपाध्याय या तडीपार गुंडांना अटक केली. तर खून करून अनेक वर्षे फरार असलेल्या चिन्मय शिंदे याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने आणि अजित सिंह याला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. तर गुंड सौरभ वर्तक याला पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. कुख्यात गुंड सिद्धू अभंगे यालाही पोलिसांनी नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सिद्धू अभंगेविरोधात मारामारी, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका वर्षांसाठी त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.