News Flash

रब्बी हंगामासाठी ठाणे जिल्हा सज्ज

हरभरा आणि भुईमूग या पिकांच्या बियाणांचे शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानाद्वारे वाटप करण्यात येणार आहे.

कृषी विभागाकडून हरभरा, भुईमुगाच्या बियाणांचे १०० टक्के अनुदान

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात तसेच अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे पावसामुळे शेतजमिनीत असलेल्या ओलाव्याचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा करून देता येईल, यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा कृषी विभागातर्फे विशेष रब्बी हंगाम नियोजन आखण्यात आले असून त्यामध्ये हरभरा आणि भुईमूग या पिकांच्या बियाणांचे शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानाद्वारे वाटप करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. या ओल्या दुष्काळात जिल्ह्य़ात ४२ हजार ४०६ हेक्टर शेतजमिनीवरील पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ४२ हजार २६२ हेक्टरवरील भाताचे, १२७ हेक्टरवरील नाचणी पिकाचे तर ३७ हेक्टरवरील वरई पिकाचे नुकसान झाले. भातपीक काढणीच्या दिवसातच अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष रब्बी हंगाम नियोजन आखले आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने त्याठिकाणी रब्बी पिकांची लागवड व्हावी आणि त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा या उद्देशातून हे नियोजन आखण्यात आले आहे.

यंदा खरीप हंगामामध्ये जिल्ह्य़ात १४६.६० टक्के पाऊस झाला आहे. मात्र, रब्बी (उन्हाळी) हंगामाच्या पिकांचे क्षेत्र वाढवण्यासाठी हा पाऊस फायद्याचे ठरल्याचे जिल्हा कृषी विभागाने सांगितले. नैसर्गिकरीत्या झालेल्या पावसामुळे शेतीकरिता आवश्यक अशा पाण्याची साठवणूक करणारे पाणवठा क्षेत्र ही पूर्णपणे भरले आहेत. याचा फायदा हा रब्बी पिकाच्या शेतीसाठी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

नियोजन असे

’ १ हजार ४४४ हेक्टर शेती जमिनीवर हरभरा या पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना ८६६ क्विंटल हरभरा बियाणांचे १०० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.

’ बीजप्रक्रिया करण्यासाठी द्रवरूप रायझोबियम हे जैविक खतही १०० टक्के अनुदानावर दिले जाणार आहे.

’ भात पड क्षेत्रावर रब्बी गळीत धान्य योजनेअंतर्गत भुईमूगची लागवड केली जाणार आहे.

’ १३७ हेक्टर क्षेत्रावर हि लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये ८२.२० क्विंटल बियाणांची मागणी महाबीजकडे तर २०५.५० लीटर रायझोबियमची मागणी कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अंकुश माने यांनी दिली.

रब्बी पिकाविषयी जनजागृती

जिल्ह्य़ात यंदा चांगला पाऊस झाल्याने ओढे नाले यामध्ये जमा झालेल्या पाणी रब्बी हंगामातील पिके आणि भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ात वनराई बंधारे कार्यक्रम जिल्हा परिषदेकडून राबवण्यात येत आहेत. त्यापाठोपाठ आता या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पथनाटय़ाद्वारे जनजागृती केली जात असून त्यामध्ये  ओढे नाल्यात साचलेल्या पाण्याचा रब्बी पिकांसाठी कसा वापर करावा याबाबत जनजागृती केली जात आहे. या पथनाटय़ाची सुरुवात मंगळवारपासून कल्याण तालुक्यातील बापसई गावामध्ये सुरू झाली.

ठाणे जिल्ह्य़ात यंदा चांगला पाऊस झाला असून शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे रब्बी हंगाम नियोजनाची आखणी करण्यात आली असून याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

– अंकुश माने, जिल्हा कृषी अधिक्षक, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 4:06 am

Web Title: thane district ready for rabi crops zws 70
Next Stories
1 तपास चक्र : उडत उडत आलेली खबर
2 वीटभट्टय़ाही थंडावल्या
3 ‘बुलेट ट्रेन’ला पुन्हा तीव्र विरोध
Just Now!
X