दिवसभरात जिल्ह्य़ात ४०१ मिमी पावसाची नोंद; रस्त्यांवर पाणी, खड्डे यांमुळे वाहतूक विस्कळीत

ठाणे : सप्टेंबरचा पंधरवडा उलटल्यानंतरही मुक्काम ठोकून बसलेल्या पावसाने मंगळवारी ठाणे जिल्ह्य़ाला अक्षरश: बदडून काढले. संपूर्ण जिल्ह्य़ात मंगळवारी दिवसभर सरासरी ४०१.४० मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे ठाण्यासह कल्याण, डोंबिवली अशा शहरांतील सखल भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा सर्वाधिक फटका भिवंडी परिसराला बसला. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने मुंबई-नाशिक महामार्ग, आनंदनगर टोल नाका परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसामुळे घोडबंदरसह आणखी काही भागांत वीजपुरवठा खंडितही झाला होता.

ठाणे शहरासह जिल्ह्य़ातील कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर या भागांना पावसाने अक्षरश झोडपून काढले. भिवंडीतील गोपाळनगर, तीनबत्ती, कारोळी रस्ता, काकुबाई चाळ, नदीनाका या भागांत घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. ठाणे तसेच इतर उपनगरांमध्ये पाणी साचले नसले तरी रस्त्यावर पडलेल्या मोठय़ा खड्डय़ांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अंतर्गत मार्गासह मुख्य मार्गावर मोठय़ा आकाराचे खड्डे पडले असून या भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे खड्डे आणि रस्त्याचा अंदाज वाहनचालकांना वाहन चालवताना येत नव्हता. परिणामी वाहतूक संथ गतीने सुरू राहून अनेक भागांत कोंडी झाली होती. आनंदनगर पथकर नाका, माजिवडा, खारेगाव पथकर नाका, मुंबई-नाशिक महामार्ग, एलबीएस मार्ग, नितीन जंक्शन परिसर या भागात वाहतूक कोंडी दिवसभर होती. मानकोली आणि कल्याण नाका भागातही पाणी साचल्यामुळे

वाहतूक संथ होऊन या भागातही सकाळी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

धरणक्षेत्रातही मुबलक

जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी, भातसा आणि आंध्रा धरणक्षेत्रात आठवडय़ाभरापासून होणाऱ्या मुसळधार पावसाने कृपा केली असून धरण प्रकल्पाच्या पाणीसाठय़ात वाढ झाली आहे.

बारवी, भातसा आणि आंध्रा धरणक्षेत्रात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अनुक्रमे ८, ६ आणि ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

वीजपुरवठा खंडित

धो-धो पाऊस कोसळत असताना दुसरीकडे विविध तांत्रिक बिघाडांमुळे ठाणे, कल्याण भागात वीजपुरवठा खंडित झाला. ठाण्यातील घोडबंदर भागाला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या कोलशेत उपविभागातील विद्युतवाहिनीमध्ये सकाळी सहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड आणि रितू इस्टेट या भागांतील विद्युतपुरवठा दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद करण्यात आला होता. नौपाडा येथील विष्णूनगर भागात विद्युतवाहिनीतील तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विद्युतपुरवठा बंद करण्यात आला होता. यशोधननगर येथील देवेंद्र औद्योगिक विभाग, लोकमान्यनगर म्हाडा परिसर, ठामपा शाळा परिसर, भगीरथी आणि रेश्मा गृहसंकुल या भागात दुपारी विद्युतपुरवठा खंडित झाला होता, तर कल्याण पूर्वेतील खडे गोळवली भागातही विद्युतपुरवठा खंडित झाल्याचे स्थानिक  नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

पाणीसाठा       साठय़ाची

(दलघमी)       टक्केवारी

भातसा       ९३०.३४         ९८.८२

आंध्रा          ३३९.१          १००

बारवी        ३३४.८६          ९८.८३

जिल्ह्य़ातील सरासरी पाऊस

(जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या आकेडवारीनुसार)

ठाणे           ८०

कल्याण        ९२

मुरबाड         ६

उल्हासनगर     ६४

अंबरनाथ       ६४

भिवंडी         ९०

शहापूर         ५