तोटय़ात चाललेल्या लांब पल्ल्याच्या सेवा रद्द केल्याचा ठाणे विभागाला फायदा

राज्यभरात एस.टी. सेवेच्या उत्पन्नात घट होत असली तरी ठाणे विभागाच्या उत्पन्नात मात्र वाढ होत आहे. इतर विभागांच्या तुलनेत ठाणे विभागाचे उत्पन्न गेल्या दोन वर्षांत ८.३७ टक्क्य़ांनी वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ठाण्याहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाडय़ांना प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नव्हता. अशा तोटय़ात चालणाऱ्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्याऐवजी प्रवाशांची मागणी असणाऱ्या स्थानिक फेऱ्या वाढविल्या. त्याचा परिणाम म्हणून एस.टी.चे उत्पन्न वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडय़ांनी प्रवास करण्याला आता दुय्यम पसंती दिली जाते. आरामबस अथवा खासगी वाहनांनी प्रवास करण्याकडे शहरी प्रवाशांचा ओढा असतो. मात्र, ठाण्यात शहरांतर्गत प्रवासासाठी एसटी उपयुक्त ठरू लागली आहे. ठाणे- बोरिवली, ठाणे- भाईंदर, ठाणे- भिवंडी, कल्याण -पनवेल, कल्याण- मुरबाड, कल्याण-पडघा या एसटीच्या बससेवांना प्रवाशांची गर्दी होत आहे. या शहरांदरम्यान प्रवास करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेले साधन नसल्याने प्रवासी एसटीच्या प्रवासाकडे वळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या स्थानिक फेऱ्यांमुळे

एसटीच्या उत्पन्नातही वाढ होऊ लागली आहे.

दुसरीकडे, उत्पन्न वाढवून तोटा कमी करण्यासाठी फारसा प्रतिसाद नसलेल्या लांब पल्ल्याच्या १४ गाडय़ा रद्द करण्यात आल्या. त्यामध्ये  ठाणे-धुळे, ठाणे- चिपळूण (मुंब्रा मार्गे), ठाणे- पाचोरा, भाईंदर- चोपडा, ठाणे-धनेगाव, शहापूर-नगर, कल्याण- शिवथळगड, कल्याण – पिंपळनेर, विठ्ठलवाडी -पाडळीदर्या, विठ्ठलवाडी- शिर्डी,वाडा-शिर्डी, ठाणे -दिवेआगर, ठाणे – पिंपळोली, ठाणे-तुळजापूर या गाडय़ा गेल्या दोन वर्षांत बंद करण्यात आल्या आहेत.

कोकणात कमी पसंती

कोकणात जाणाऱ्या गाडय़ा भरून जात असल्या तरी येताना त्या रिकाम्याच येतात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाडय़ांमुळे नुकसान होते. कोकणात राहणाऱ्या प्रवाशांना रेल्वेची सोय असल्याने हे प्रवाशी प्रामुख्याने रेल्वेची वाट धरतात. 

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये बहुतेक प्रवासी शेवटपर्यंत प्रवास करीत नाहीत. गाडी मात्र शेवटच्या स्थानकापर्यंत न्यावी लागते. त्यामुळे नुकसान होते. अशा १४ गाडय़ा गेल्या दोन वर्षांत बंद केल्या. त्याऐवजी स्थानिक फेऱ्या सुरू केल्या.

-आर. एच. बांदल, विभागीय अधिकारी, ठाणे