मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन

ठाणे-डोंबिवलीदरम्यानचा प्रवास अध्र्या तासात पूर्ण व्हावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या महत्त्वाकांक्षी माणकोली-मोठागाव ठाकुर्ली पुलाचे येत्या रविवारी, १८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या पुलामुळे शिळफाटा आणि भिवंडी बाह्य़वळण रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी होऊन वेगवान प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या उड्डाणपुलांच्या सोबतीला कोनगाव ते कल्याणदरम्यान दुर्गाडी येथे तयार करण्यात येणाऱ्या सहा पदरी उड्डाणपुलाचेही भूमिपूजन करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरणाच्या माध्यमातून या पुलांची कामे केली जाणार आहेत. ठाणे-डोंबिवलीदरम्यानचा प्रवास अधिक जलगतीने होण्यासाठी माणकोली ते मोठागाव ठाकुर्लीदरम्यान उड्डाणपुलाची निमिर्ती करण्याचा निर्णय एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आला होता. या पुलामुळे ठाणे ते डोंबिवलीदरम्यानचा प्रवास अध्र्या तासाहून कमी होणार आहे. उड्डाणपुलाचे नियोजन झाल्यानंतरही या कामाची सुरुवात होण्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

भिवंडी तालुक्याच्या विकासाबरोबरच ठाणे-डोंबिवली या दोन शहरांना जवळ आणणाऱ्या माणकोली-मोठागाव पुलाची आवश्यकता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना पुलाच्या काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तांत्रिक बाबींची पूर्तता करून या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून रविवार १८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन पूर्ण करण्यात येणार आहे.