ठाणे, डोंबिवलीत वाहतूक पोलिसांकडून अद्याप नियोजन नाही; खरेदीसाठीच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
ठाणे, डोंबिवली शहरांतील प्रमुख बाजारपेठांत दिवाळीपूर्व खरेदीच्या गर्दीमुळे रविवारी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीनंतरही पोलिसांनी येथील वाहतूक नियोजनाकडे दुर्लक्ष केले आहे. दर वर्षी या बाजारपेठांच्या परिसरात वाहतूक बदल राबवणाऱ्या वाहतूक विभागाने यंदा अद्याप कोणतीही अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे सोमवारी, सुट्टी नसतानाही ठाण्यातील बाजारात वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते. पोलिसांनी मात्र, ‘वाहतूक नियोजनासाठी अभ्यास सुरू आहे’ असे मासलेवाईक उत्तर दिले आहे.
ठाण्यातील गोखले मार्ग, राम मारुती रोड या रेल्वे स्थानकाला शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवरच मोठय़ा बाजारपेठा आहेत. सणासुदीच्या काळात हे रस्ते ग्राहकांच्या गर्दीने गजबजून जातात. दिवाळीच्या आधी तर येथील गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाते. डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांवरही दिवाळीच्या हंगामात असेच चित्र पाहायला मिळते. येथील गर्दीचा विचार करून ठाणे वाहतूक पोलीस दर वर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी या रस्त्यांवर वाहतूक बदल राबवतात. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे इतर वाहनांची कोंडी होऊ नये, असा या नियोजनाचा उद्देश असतो. यंदा मात्र अजूनपर्यंत पोलिसांनी कोणतीही अधिसूचना काढलेली नाही. (पान ३ वर)
बाजारांतील कोंडी बेदखल
वाहतूक पोलिसांनी पुरेशी दक्षता घेतली नसल्याने शनिवार, रविवार दोन्ही दिवस जांभळी नाका परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. प्रचंड वाहन कोंडी आणि नागरिकांची गर्दी यामुळे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती ओढविण्याची भीतीही काही नागरिक व्यक्त करीत होते. ठाण्यातील मुख्य बाजारपेठ या सर्व मार्गाना जोडण्यात आलेली असून या ठिकाणी सायंकाळच्या वेळेत दिवाळी खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजन आखलेले नाही. गेल्या चार दिवसांच्या कोंडीनंतर खडबडून जाग आलेल्या पोलिसांनी आता नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिवाळीच्या निमित्ताने ठाण्यात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होऊ लागली असून ही कोंडी सोडविण्याकरिता तातडीने अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये १ नोव्हेंबरपासून शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचे नियोजन आखले जाणार आहे.
-अमित काळे,पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे
उल्हासनगरासाठी पोलीस दक्ष
उल्हासनगर हे व्यापारी उलाढालींचे मोठे केंद्र मानले जाते. दिवाळीच्या काळात या ठिकाणी फटाके आणि कपडय़ांची मोठी बाजारपेठ भरते. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक दोन आणि तीन मधील नेहरू चौक या ठिकाणी मुख्य बाजारपेठ आहे. दिवाळी खरेदीसाठी या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. उल्हासनगर कॅम्प क्रमांक-२ मधील नेहरू चौकाकडून शिरू चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक नेहरू चौकातून देवी भवानी चौक मार्गे गोल मैदान येथून वळविण्यात आली आहे. १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री अकरा या वेळेत हा वाहतूक बदल लागू करण्यात आला आहे. या संदर्भात वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 2:03 am