|| किशोर कोकणे

ठाणे ते डोंबिवली स्थानकांदरम्यानची वर्षभरातील जीवितहानी

ठाणे : कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वेतून तीन प्रवासी खाली पडल्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल गाडय़ांना होणाऱ्या गर्दीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानकादरम्यान लोकलच्या गर्दीमुळे गेल्या वर्षभरात १४३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून अशा अपघातांमध्ये गेल्या वर्षभरात ३४९ प्रवासी जखमी झाले आहेत. या आकडेवारीनुसार सरासरी दोन दिवसाआड एका प्रवाशाला लोकल अपघातात प्राण गमावावे लागत असून दररोज सरासरी एक प्रवासी अपघातात जखमी होत आहे.

ठाणे ते कसारा आणि कर्जत या दरम्यानच्या स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी मुंबईमध्ये कामानिमित्त प्रवास करतात. ठाणे पल्ल्याडच्या शहरांचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून यामुळे या भागातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा भार वाढल्याचे चित्र आहे. मात्र, त्या तुलनेत लोकल गाडय़ांची सुविधा पुरेशी नसल्यामुळे प्रवाशांना लोकलच्या गर्दीतून प्रवास करावा लागतो आहे. या गर्दीमुळे मात्र लोकलमधून पडून प्रवाशांना प्राण गमावावे लागत आहेत. २०१५ मध्ये भावेश नकाते याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला खडसावले होते. तसेच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, पाच वर्षे उलटूनही रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजही प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होत आहे. रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात म्हणजेच १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत ठाणे ते कसारा आणि बदलापूर या रेल्वे मार्गावर लोकलमधून पडून १४३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ठाणे ते दिवा या भागात लोकलमधून पडून ४५, डोंबिवली ते ठाकुर्ली तसेच भिवंडी, खारबाव, कामन रोड आणि जुचंद्र रेल्वे स्थानकादरम्यान ४४, तर कल्याण ते बदलापूर आणि कसारापर्यंत ५४ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. तसेच या सर्वच स्थानकादरम्यान गेल्या वर्षभरात ३४९ प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला २०१५ मध्ये खडसावले होते. तसेच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी उपपायोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पश्चिम रेल्वेने अंधेरी ते विरापर्यंत सर्व स्थानकावर १५ डब्ब्यांचे फलाट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पश्चिम रेल्वे हे करू शकते. तर मध्य रेल्वेला कोणत्या अडचणी आहेत. मध्य रेल्वेने गर्दी नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीत. – समीर झवेरी, रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते