ब्रह्मांड भागातील वृद्धेची हत्या बदला आणि चोरीच्या उद्देशाने; दोघांना अटक

घोडबंदर येथील ब्रह्मांड भागात ८४ वर्षीय वृद्धाची आणि त्यांना सांभाळणाऱ्या व्यक्तीची घरात शिरून निर्घृण हत्या करणाऱ्या दोघा मारेकऱ्यांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी पहाटे अटक केली. वृद्धाच्या हत्येमुळे संवेदनशील बनलेल्या या गुन्ह्य़ाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. वडिलांची नोकरी गेल्याचा बदला आणि घरातून रोकडसह किमती ऐवज चोरण्याच्या उद्देशातून हे हत्याकांड झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रशांत सदाशिव पवार (२८) आणि आशीष वीरेंद्र यादव (१९) अशी दोघा मारेकऱ्यांची नावे असून हे दोघे कल्याण पूर्व परिसरात राहतात. प्रशांतचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे, तर आशीष उच्चशिक्षित असून तो फार्मा कंपन्यांमध्ये काम करीत होता. सध्या मात्र तो बेरोजगार आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघांना मुंबईतील धारावी परिसरातून अटक केली. सीताराम श्रॉफ (८४) आणि त्यांना सांभाळणारा संतोष लवंगरे (४०) यांची हत्या केल्याची कबुली दोघांनी दिली आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. दुहेरी हत्याकांडाप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच वृद्धाची हत्या असल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले होते आणि या गुन्ह्य़ाच्या तपासाचा आढावा पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित हे स्वत: घेत होते. कासारवडवली पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची विविध पथके मारेकऱ्यांचा माग काढत होती. मात्र या गुन्ह्य़ाचा उलगडा करण्यात युनिट १ च्या पथकाला यश आले असून घरातून चोरीस गेलेला ऐवज दोघा मारेकऱ्यांकडून जप्त करण्यात आला आहे, असेही पराग मणेरे यांनी सांगितले.

घटनाक्रम..

प्रशांत आणि आशीष यांनी ठरलेल्या कटाप्रमाणे इमारतीत प्रवेश केला. यावेळी इमारतीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाने दोघांना अडवून त्यांची चौकशी केली. त्यानंतर दोघांनी इमारतीच्या नोंदवहीत नोंदणी केली . प्रशांतला सीतारामओळखत असल्यामुळे संतोषने प्रशांत व त्याचा मित्र आशीषला घरात घेतले.  त्यानंतर काही वेळाने अचानक दोघांनी संतोषवर ब्लेडने वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यानंतरही तो जिवंत असल्याचे लक्षात येताच प्रशांतने घरातून चाकू आणून त्याच्यावर वार केले. त्यात संतोषचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीताराम यांच्या डोळ्यादेखत घडल्यामुळे दोघांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला. प्रशांतने त्यांच्या छातीमध्ये चाकू मारला, पण तो खोलवर न गेल्यामुळे त्याने चाकूवर जोरात पाय मारून तो त्यांच्या छातीत खोलवर घुसविला आणि नंतर उशीने तोंड दाबून त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री केली.

बदला आणि चोरीचा उद्देश..

रिजन्सी हाइटस् इमारतीत राहणारे सीताराम श्रॉफ (८४) हे वयोमानामुळे अंथरुणातच होते. त्यामुळे स्वत:ची देखभाल करण्यासाठी त्यांनी मुंबईतील एका खासगी कंपनीमार्फत केअरटेकरची नेमणूक केली होती.  त्यापूर्वी आरोपी प्रशांत पवारचे वडील सदाशिव हे  केअरटेकर म्हणून काम करीत होते, परंतु त्यांना  कामावर जाणे शक्य होत नव्हते, तेव्हा प्रशांत वडिलांऐवजी सीताराम यांच्या घरी कामासाठी जायचा, मात्र प्रशांत कामावर सतत दांडी मारत असल्यामुळे त्याला कामावरून काढण्यात आले. यामुळे आर्थिक उत्पन्नाचा मार्ग बंद झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी प्रशांतने ही हत्या केली.