News Flash

ठाण्यात भाजप निर्णायक ठरेल!

स्पष्ट बहुमत कुणालाही मिळणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा अंदाज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

स्पष्ट बहुमत कुणालाही मिळणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा अंदाज

ठाणे महापालिकेतील सत्तास्थापनेत भाजपची भूमिका निर्णायक असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. ठाणे महापालिका ही ठरावीक नेत्यांसाठी उत्पन्नाचे साधन होऊन बसली आहे. ठाणेकरांना बदल हवा आहे. त्यामुळे स्वतला मातब्बर वगैरे म्हणविणाऱ्या अनेकांच्या पायाखालची वाळू निकालानंतर सरकलेली दिसेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

निवडणूक प्रचाराची सांगता होण्यापूर्वी फडणवीस यांनी रविवारी ठाण्यातील गटप्रमुखांसोबत संवाद साधला. या संवादसभेनंतर ते ‘लोकसत्ता’शी बोलत होते. गेली अनेक वर्षे ठाण्यात आम्ही शिवसेनेसोबत युतीत लढलो. युतीच्या जागावाटपात भाजपच्या पदरात फार काही पडत नसे. त्यामुळे ठाणे महापालिकेत आजवर भाजपच्या नगरसेवकांची संख्या दहाच्या आत असायची. यंदा मात्र हा आकडा मोठा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा आकडा नेमका किती असू शकतो अशी विचारणा केली असता, ‘ठाण्यात सुशासन आणण्यासाठी तो निर्णायक असेल’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. माझ्या वक्तव्याचा दाखला देत येथे आम्हाला संधी नाही असे चुकीचे वृत्त एका वर्तमानपत्रातून छापून आले आहे. माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढून हे वृत्त दिले गेले असून त्यासंबंधीचा खुलासा मी यापूर्वीच केला आहे.

ठाण्यातून मला जी माहिती मिळते आहे ते पाहता अनेक धक्कादायक निकाल येथे दिसू शकतात आणि भाजपसाठी ते फलदायी ठरू शकतात, असा दावाही त्यांनी केला.

  • महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना शिवसेनेसोबत युतीच्या बैठका सुरूअसताना यंदा युती करू नका असे हजारो संदेश मला ठाण्यातील नागरिकांचे आले होते.
  • येथील कारभाराविषयी नागरिकांच्या मनात असलेल्या नाराजीचे हे निदर्शक होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपचा आकडा हा गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत बराच मोठा असेल आणि सत्तास्थापनेत तो निर्णायक असेल असा दावा करताना ठाण्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाजही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 2:14 am

Web Title: thane elections 2017 bjp 2
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांना ठाणेकर धडा शिकवतील
2 महिला पदाधिकाऱ्याला मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा
3 काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांचे मारेकरी अटकेत
Just Now!
X