दिव्यात मतदारांच्या उत्साहावर पाणी; सायंकाळपर्यंत मतदारांचा ओघ कायम

ठाणे महापालिका निवडणुकीत यंदा अकरा जागांमुळे राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा असलेल्या दिवा परिसरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या उत्साहावर निवडणूक यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने पाणी फेरले. मतदार यादीत नाव असूनही स्वत:चा मतदान अनुक्रमांक आणि मतदान कक्ष शोधताना नागरिकांना बरीच कसरत करावी लागली. मात्र, तरीही संध्याकाळपर्यंत मतदारांचा ओघ मतदान केंद्रांकडे कायम होता.

दिव्यात सकाळी दहापर्यंत मतदार जास्त प्रमाणात बाहेर पडले नव्हते. साधारण साडेदहापर्यंत अवघे २५ टक्के मतदानाची नोंद झाली. परंतु, सकाळी ११पासून मतदान केंद्रांवर रांगा लागण्यास सुरुवात झाली. परंतु, अनेक मतदारांकडे मतदार पावती नसल्याने मतदान केंद्र शोधताना त्यांची दमछाक झाल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाकडून मतदार पावती देण्यात आली नव्हती. मतदान केंद्राच्या परिसरात असलेल्या राजकीय पक्षांच्या टेबलांवर मतदार यादीतून नावे शोधून मतदारांना एका चिठ्ठीवर नाव व अनुक्रमांक दिले जात होते. परंतु, अनुक्रमांकानुसार मतदान केंद्रावर शाळा खोली नसल्याने पुन्हा मतदारांना धावाधाव करावी लागली. निवडणूक आयोगाकडील मतदार यादीत शाळांच्या खोली क्रमांकानुसार मतदारांना मतदान करता येत होते. त्यामुळे अनेक मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपले प्रभाग वेगळे असल्याचे समजत होते. काही राजकीय कार्यकर्त्यांनी इतर प्रभागांत फिरून अशा मतदारांची नावे शोधून देण्याचेही काम केले. परंतु, एकूण गोंधळाच्या तुलनेत ही मदत अपुरीच ठरली.

बोगस मतदान टाळण्याची धडपड

बोगस मतदान टाळण्यासाठी दिव्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना लवकरात लवकर मतदान करण्यासाठी आवाहन करताना दिसून आले. तसेच मतदान केंद्रांबाहेरही उमेदवार उभे राहून मतदारांना पक्षाचे चिन्ह सांगून मतदान करण्याचे आवाहन करत होते. सकाळी ९ वाजेपर्यंत दिवावासीय मोठय़ा प्रमाणात मतदान करण्यासाठी खाली उतरले नसल्याने उमेदवारांच्या मनात धाकधुक होत होती. प्रत्येकाने सोसायटय़ांमध्ये जाऊन नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुपारी एकपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचे दिसून आले. पश्चिमेतील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मतदान करण्यासाठी मतदारांनी एकच गर्दी केली होती. मात्र साऊथ इंडियन शाळा, नॅशनल स्कूल आणि वारेकर हायस्कूल येथे मात्र तुरळक गर्दी दिसून आली. मतदार मत देण्यासाठी बाहेर पडल्यानंतर बुथवर त्यांना चहा, वडापावचीही सोय काहींनी केली होती. ओळखीच्या  मतदारांना नाश्ता करण्यासाठी कार्यकर्ते आग्रह करताना दिसून आले.

बोगस मतदारांवर नजर

ठाणे शहरात अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या घटना घडल्या. या पाश्र्वभूमीवर बोगस मतदानाचे प्रमाण वाढू नये म्हणून रेल्वे स्थानकातही तिकीट तपासनीसांची संख्या वाढविण्यात आली होती. दिवा स्थानकात सकाळी फारसे तिकीट तपासनीस नसतात. मात्र मंगळवारी एकाच फलाटावर सात ते आठ तिकीट तपासनीस दिसून आले. फलाट क्रमांक एक व दोनवर धीम्या गतीच्या लोकलचा थांबा आहे. या गाडय़ांमधून येणाऱ्या नागरिकांवर हे तपासनीस बारकाईने नजर ठेवून होते. महिला व पुरुष तिकीट तपासनीस घोळक्याने येणाऱ्या संशयास्पद नागरिकांची चौकशी करत होते. त्यांचे रेल्वे ओळखपत्र तसेच तिकीट तपासले जात होते. दिवा शहरात उत्तर भारतीय मतदार जास्त प्रमाणात असल्याने या भागात बोगस मतदान जास्त प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे बाहेरून येणारे नागरिक तसेच उत्तर भारतीयांची खास करून चौकशी केली जात होती.