याद्यांतील गोंधळामुळे हजारो ठाणेकर हक्कापासून वंचित

लोकशाही व्यवस्था सुदृढ करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा, तुमचे मत महत्त्वाचे आहे, मतदान हे कर्तव्य आहे, असे आवाहन करून मतदारांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या निवडणूक यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे मंगळवारी हजारो मतदारांना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागले. लोकशाहीप्रति आपले कर्तव्य पार पडण्यासाठी मोठय़ा उत्साहाने सकाळपासून घराबाहेर पडलेल्या हजारो मतदारांची नावे मतदार याद्यांमध्येच नसल्याने जबरदस्त गोंधळ उडाला. ठाण्यात अनेक ठिकाणी मतदारांची नावे भलत्याच प्रभागात गेल्याचे आढळून आले. त्यामुळे आपले मत वाया जाऊ नये यासाठी मतदारांना स्थानिक प्रभाग सोडून दुसऱ्याच प्रभागातील उमेदवारांना मत‘दान’ करावे लागले. याशिवाय यादीतून नावे वगळणे, यादीत नाव नसणे, यादी क्रमांक बदलणे, अनुक्रमणिका बदलणे, चुकीची नावे यादीत छापणे अशा प्रकारांमुळे मंगळवारी मतदारांची दाणादाण उडाली.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पालिका निवडणूक विभागाने शहरात जोरदार जनजागृती मोहीम राबवली होती. लोककला आणि चित्रफितींच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जात होती. या साऱ्यांतून मतदानाचा हक्क बजावणे, किती महत्त्वाचे आहे हे ठाणेकरांच्या मनावर बिंबवण्यात यंत्रणेला यश मिळाले. त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली. निवडणूक विभागाने केलेल्या अंतिम यादीच्या आधारे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी वाटलेल्या मतदान पावत्या घेऊन मतदार मतदान केंद्रावर दाखल झाले. परंतु तिथे त्यांचे नाव नसल्याचे प्रकार सर्वच प्रभागांत दिसून आले. त्यामुळे मतदारांकडून निवडणूक यंत्रणेविषयी प्रचंड असंतोष दिसून येत होता. काही मतदारांची नावे यादीत नव्हती. यादीत नावे असली तरी मतदारांचे छायाचित्र नव्हते तर अनेकांच्या घराचा पत्ता बदलण्यात आला होता. महापालिका क्षेत्रातील सर्वच प्रभागांमध्ये मतदार यादीतील हा घोळ दिसून आला. या घोळामुळे अनेकांनी मतदानाचा हक्क  बजावण्याऐवजी पुन्हा घरी जाणे पसंत केले. प्रत्येक प्रभागातील मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या शेकडो तक्रारी पुढे आल्या आहेत.

राबोडी भागात तीनशे कुटुंबांची नावे कापण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. परेरानगर परिसरातही २० कुटुंबांची नावे कापण्यात आल्याची तक्रार समोर आली आहेत. तसेच असाच प्रकार नौपाडा भागातही घडला असून येथील मतदारांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. असाच प्रकार नौपाडा भागातही घडला असून येथील मतदारांनी नाराजी व्यक्त केली. वागळेतील सावरकरनगर, लोकमान्यनगर आणि कळवा भागातही अशीच काहीशी परिस्थिती होती. विष्णुनगर परिसरात एका इमारतीतील सर्व रहिवासी अनेक वर्षे मतदान करत असले तरी यंदा मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क  गमवावा लागला असल्याचा रोष नागरिक व्यक्त करताना दिसत होते.

मृत यादीत, हयात वंचित

नौपाडा प्रभाग समितीत लक्ष्मीबाई साळुंके या अनेक वर्षे मतदान करत असूनही या महापालिका निवडणुकीसाठी यादीत नाव नसल्याने त्यांना मतदान करत आलेले नाही. याउलट लक्ष्मीबाई यांच्या दिवंगत दोन्ही मुलांची नावे मतदार यादीत होती.

अ‍ॅपही निरुपयोगी

नागरिकांना मतदान करणे सुलभ व्हावे म्हणून ठाणे महापालिका निवडणूक यंत्रणेने ‘ठाणे वोटर्स सर्च’ ही अ‍ॅपप्रणाली मतदारांसाठी सुरूकेली. त्यामुळे नागरिक निर्धास्त होते, परंतु या अ‍ॅपवर अनेक मतदारांची नावे असली तरी प्रत्यक्षात मात्र मतदानासाठी मतदान केंद्रावर गेल्यावर यादीत नाव नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडत होता. परिणामी ‘ठाणे वोटर्स ऑनलाइन अ‍ॅप’चा उपयोग काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. सर्वच प्रभागांमध्ये राजकीय पक्षांच्या बुथवर मतदारांना मोबाइल अ‍ॅपद्वारे माहिती मिळवून त्यांना हस्ताक्षरात मतदान पावत्या दिल्या जात होत्या.

कोपरीतील मतदान यंत्रात बिघाड

कोपरीतील आनंद भारती, युनायटेड शाळेत मतदान सुरूअसताना येथील मतदान यंत्र बंद पडल्या. ९९ ते १०० मते झाल्यानंतर मतदान यंत्रणा बंद पडली. त्या जागी नवीन मतदान यंत्रे बसविण्यात आली. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांकडून नाराजी व्यक्त होत होती.