News Flash

शिवसेनेच्या वर्चस्वाला भाजपचे आव्हान

ठाणे शहराचे विस्तारीकरण होऊन वसलेल्या घोडबंदरला नवे ठाणे म्हणून ओळखले जाते.

ठाणे शहराचे विस्तारीकरण होऊन वसलेल्या घोडबंदरला नवे ठाणे म्हणून ओळखले जाते. शहरातील काही जुने नागरिक आणि शहराबाहेरून आलेले नागरिक या ठिकाणी राहत असल्याने नव्या आणि जुन्यांची समिश्र वस्ती म्हणून घोडबंदरकडे पाहिले जाते. असे असले तरी गेल्या काही महापालिका निवडणुकांमध्ये घोडबंदर भागात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. तसेच गेल्या निवडणुकीत या भागातून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यापैकी बहुतेक नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला असून ते या दोन्ही पक्षांच्या तिकिटावर यंदाची निवडणूक लढवीत आहेत. त्याचप्रमाणे गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली होती. त्यात शिवसेनेने बाजी मारली असली तरी भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोघे स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून दोघांनी एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करत उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे घोडबंदर भागातील चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

सेना- मनसेत चुरस

प्रभाग क्रमांक २ मध्ये हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रह्मांड, अकबर कॅम्प असा परिसर येतो. उच्चभ्रू वसाहती आणि झोपडपट्टी अशी संमिश्र लोकवस्ती असलेला हा प्रभाग आहे. या प्रभागातून पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर मनोहर डुंबरे हे निवडून आले होते. यंदा मात्र ते भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक २ (ड) मधून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेने संजय मोरे, राष्ट्रवादीने चंद्रशेखर पाटील आणि मनसेने विश्वास जोगदंडे यांना उभे केले आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक २ (ब) शिवसेनेच्या नगरसेविका बिंदू मढवी निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्यासमोर भाजपने कविता पाटील यांना उभे केले असून त्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यामुळे या प्रभागातील दोन्ही लढती चुरशीच्या होणार आहेत.

प्रभाग क्र

 • क्षेत्र – हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रह्मांड, अकबर कॅम्प
 • स्त्री – १९०३८
 • पुरुष – १६४५८
 • एकूण लोकसंख्या- ३५४९६

तिरंगी लढत

नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात चार प्रभाग असून त्यामध्ये प्रभाग क्रमांक १, २, ३ आणि ८ असे एकूण चार प्रभाग येतात. या चारही प्रभागांमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये ओवळे, कासारवडवली, भाईंदरपाडा आणि कावेसर हा परिसर येतो. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या भागातून शिवसेनेचे नरेश मणेरा निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने राम ठाकूर तर राष्ट्रवादीने बाळकृष्ण पाटील यांना उभे करून त्यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे प्रभागातील ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक -१

 • क्षेत्र – ओवळे, कासारवडवली, भाईंदरपाडा, कावेसर.
 • स्त्री – १३८७१
 • पुरुष – १५४८८
 • एकूण लोकसंख्या- २९३५९

 

काँग्रेस-शिवसेनेत लढत

प्रभाग क्रमांक – ३ मध्ये मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर असा परिसर येतो. या प्रभागातून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि मधुकर पावशे हे दोघे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले भूषण भोईर यांनाही याच प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी या प्रभागातून काँग्रेसच्या तिकिटावर जयनाथ पूर्णेकर निवडून आले होते. यंदा त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळेस त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. काँग्रेसने त्यांचे चुलत बंधू छत्रपती पूर्णेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे मधुकर पावशे विरुद्ध छत्रपती पूर्णेकर अशी लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक

 • क्षेत्र – मनोरमानगर, मानपाडा, आझादनगर
 • स्त्री – १६६८८
 • पुरुष – २३१९९
 • एकूण लोकसंख्या – ३९८८८

 

प्रभाग क्रमांक आठमध्ये बाळकुम, माजिवडा आणि हायलँड असा परिसर येतो. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेले देवराम भोईर, त्यांचे पुत्र संजय भोईर आणि सून उषा भोईर हे तिन्ही विद्यमान नगरसेवक या प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत. त्याच्यासोबत काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या निशा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये दाखल झालेल्या शारदा पाटील आणि लॉरेन्स डिसोजा यांना भाजपने उमेदवारी दिली होती. छाननी प्रक्रियेत लॉरेन्स यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे भाजपतून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे अमित नायर यांना भाजपने पुरस्कृत उमेदवार केले आहे.

प्रभाग क्रमांक – ८

 • क्षेत्र – बाळकूम, माजिवडा, हायलँड
 • स्त्री – २१७१९
 • पुरुष – २४७८२
 • एकूण लोकसंख्या – ४६५०२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 1:28 am

Web Title: thane elections 2017 sena bjp fight in thane
Next Stories
1 मतांसाठी आध्यात्म?
2 रिक्षाचालकांची मुजोरी कायम
3 म्हात्रे हत्येप्रकरणी चुलत भावावर संशय
Just Now!
X