महापालिका निवडणुकीसाठी आज मतदारांचा कौल

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, गुंडपुंडांचे प्रवेश, महापालिका आयुक्तांपासून थेट दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करत रंगलेले कुरघोडीचे राजकारण यामुळे गाजलेल्या महापालिका निवडणुकीत ठाणेकर मतदार नेमका कुणाच्या बाजूने कौल देतात, याचे भवितव्य मंगळवारी होणाऱ्या मतदानानंतर ठरणार आहे. भाजपने उभे केले आव्हान मोडीत काढून ठाणेकर मतदार शिवसेनेच्या हाती महापालिकेच्या एकहाती सत्तेच्या चाव्या देतात का, याचे उत्तर आज मतदान यंत्रात बंद होईल. पालिका निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोग व महापालिका हरतऱ्हेने प्रयत्न करत असल्याने यंदा त्याला किती ठाणेकर प्रतिसाद देतात, हेदेखील मंगळवारी सायंकाळनंतर स्पष्ट होईल.

ठाणे महापालिकेच्या जागावाटपात एरवी मित्रपक्ष असलेल्या भाजपला २०-२२ जागा सोडून काँग्रेस आघाडीसोबत झुंज देणाऱ्या शिवसेनेला यंदा प्रथमच भाजपचा सामना करावा लागत आहे. विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला असला तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीतून आयात केलेल्या उमेदवारांची कामगिरी कशी राहते, यावर भाजपची भिस्त आहे. कोपरी, वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर या परिसरांत काँग्रेस, राष्ट्रवादीतून प्रवेश दिलेल्या उमेदवारांना पुढे करत भाजपने शिवसेनेपुढे त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान उभे केले असून त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

प्रतिष्ठेच्या लढाया

* ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने संजय घाडीगावकर यांच्या माध्यमातून तब्बल नऊ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

* ठाण्याची टेकडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिरानगर प्रभागात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात विलास कांबळे यांनी, तर कोपरी भागात भरत चव्हाण, लक्ष्मण टिकमानी यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी शिवसेनेला शर्थ करावी लागणार आहे.

* वर्तकनगर भागात आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा विरुद्ध मातब्बर उमेदवार सुधाकर चव्हाण हा सामना लक्षवेधी ठरणार आहे. याच भागात राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे तसेच काँग्रेसचे विक्रांत चव्हाण या परमार प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

* नळपाडा भागात शिवसेनेकडून हट्टाने तीन जागा मागून घेणारे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे काय होणार याविषयी येथील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

* घोडबंदर भागात देवराम भोईर तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले मनोहर डुंबरे यांच्या प्रभागातील लढत चुरशीची ठरेल.

नौपाडा, कळवा कुणाचे?

ठाणे महापालिकेतील सर्वात चुरशीची लढत यंदा नौपाडा, पाचपाखाडी परिसरात पाहायला मिळत असून शिवसेना, भाजपचे बालेकिल्ले असलेल्या या प्रभागात मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहाण्यासारखे ठरेल. नौपाडा भागात शिवसेनेच्या मातब्बर उमेदवारांपुढे भाजपच्या नवख्या उमेदवारांनी आव्हान उभे केले असून येथील ब्राह्मण, सीकेपी तसेच सुशिक्षित मतदार कुणाच्या पारडय़ात मतांचे दान टाकतात याविषयी उत्सुकता आहे.  पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत कळवा, मुंब्र्याचा कल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला होता. त्यामुळे शिवसेनेने यंदा कळव्यात जोरदार ताकद लावली असून येथील स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना येथील गड शाबूत राखता येईल का हे पाहाण्यासारखे ठरेल. यंदा दिव्यात ११ जागांवर निवडणूक लढवली जात असून वाढलेल्या जागांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीत लढाई सुरू आहे.