मतदारांनो, गोंधळू नका! आजचा दिवस तुमचाच!!

ठाणे आणि उल्हासनगर या दोन महापालिकांसाठी आज, मंगळवारी मतदान पार पडत आहे. गेल्या महिनाभरापासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असल्या तरी, मंगळवारी नागरिकांचा आवाज मतदान यंत्रांमधून उमटणार आहे. ठाणे व उल्हासनगर पालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत राबवण्यात येत असल्याने मतदारांना एकाच वेळी चार मते द्यावी लागणार आहेत. या प्रक्रियेबाबत असलेला गोंधळ दूर करण्यासाठी ही प्रक्रिया कशी असेल, याची सविस्तर माहिती आम्ही देत आहोत.

ठाणे महापालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदार यादीतील नाव तसेच मतदान केंद्र शोधताना मतदारांचा गोंधळ उडू नये म्हणून महापालिका निवडणूक विभागाने ठाणे व्होटर्स सर्च इंजिन तयार केले आहे. या तंत्रज्ञानामुळे महापालिका क्षेत्रातील मतदारांना एका क्लिकवर मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्राची माहिती मिळणार आहे http://tmcvotersearch.org या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची माहिती मतदारांना मिळू शकते.

त्याचप्रमाणे ठाणे महापालिका निवडणूक विभागाने टीएमसी व्होटर सर्च या नावाचे मोबाइल अ‍ॅप तयार केले असून ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याद्वारे मतदारांना मतदान केंद्राची माहिती उपलब्ध होऊ शकते.

मतदान असे करावे..

* चार वॉर्डाचा एक प्रभाग या पद्घतीने महापालिकेची निवडणूक होणार असून या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला चारही जागांसाठी मतदान करणे आवश्यक आहे.

* प्रत्येक मतदान केंद्रावर कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार मतदान यंत्रे असणार आहेत.

* उमेदवारांच्या संख्येनुसार या चारही जागांची आखणी मतदान यंत्रांवर होईल. काही वेळेस चारही जागा दोन मतदान यंत्रांवर, तर काही वेळेस चारही जागा चार मतदान यंत्रांवर आखल्या जाऊ शकतात.

* प्रत्येक प्रभागामध्ये अ, ब, क आणि ड अशा चार जागा असणार आहेत. या चारही जागांसाठी वेगवेगळे रंग देण्यात आलेले आहेत. ‘अ’ जागेसाठी पांढरा, ‘ब’ जागेसाठी फिकट गुलाबी, ‘क’ जागेसाठी फिकट पिवळा आणि ‘ड’ जागेसाठी फिकट निळा रंग असेल.

* प्रत्येक मतदान यंत्रावर उमेदवाराचे नाव आणि त्याचे निवडणूक चिन्ह असेल.

* मतदान करताना सर्वप्रथम ‘अ’ जागेमधील आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरील बटण दाबा आणि त्यानंतर * दिवा लागेल. याचा अर्थ ‘अ’ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. हीच पद्घत ब, क आणि ड जागेसाठी वापरा. अशा प्रकारे अ, ब, क आणि ड जागेसाठी मतदान केल्यानंतर ‘बझर’ वाजेल. तुमचे मतदान पूर्ण झाले.

* एखाद्या जागेसाठी उमेदवार योग्य व सक्षम वाटत नसेल तर चारही जागांकरिता ‘नोटा’चा पर्याय देण्यात आला आहे.

* प्रत्येक प्रभागात अ, ब, क आणि ड अशा चार जागा असल्या तरी सर्वच जागांकरिता एकाच पक्षाला मतदान करणे बंधनकारक नाही. प्रत्येक जागेसाठी तो कोणत्याही उमेदवाराला मतदान करू शकतो.