ठाणे- ५८ तर, उल्हासनगरमध्ये ५० टक्के

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही शहरात मतदानाचा टक्का यंदा किंचित वाढला. ठाण्यात ५८ टक्के तर उल्हासनगरमध्ये ५०.८७  टक्के मतदान झाले. मतदार याद्या अचूक असत्या तर मतदानाची टक्केवारी वाढली असती, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत होता. ठाण्यात तुरळक घटना वगळता सर्वत्र शांतेत मतदान पार पडले. उल्हासनगरमध्ये मात्र हाणामारीच्या घटना घडल्याने तणावाचे वातावरण होते.

ठाणे तसेच उल्हासनगर या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.  मात्र, मतदार याद्यांमधील घोळामुळे अनेक मतदारांना मतदानाविनाच घरी परतावे लागले. अनेकांची मतदारांची नावे  याद्यांमधून नावे वगळण्यात आली होती तर काहींची नावे मतदार यादीत असतानाही त्यांना मतदान केंद्र सापडत नव्हती. मतदारांना राजकीय पक्षांकडून देण्यात आलेल्या मतदान पावत्यांवरील पत्ते चुकीचे होते.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ११ लाख ९४ हजार ८८६ इतके मतदार होते. त्या निवडणुकीत ५३.२५ टक्के इतके मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत १२ लाख २९ हजार ८६८ इतके मतदार होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे ३५ हजार मतदार यंदा वाढले होते. या निवडणकीत ५८ टक्के मतदान झाले आहे. गेल्यावर्षीपेक्षा मतदार आणि मतदान टक्केवारी वाढल्याचे आता स्पष्ट होत आहे. मतदार याद्यांमधील घोळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले, ठाण्यातील  मतांची टक्केवारी  वाढली असती.

पैसे वाटल्याच्या आरोपावरून मारहाण

ठाण्यातील किसननगर परिसरात पैसे वाटप करत असल्याच्या आरोपावरून माजी नगरसेवक शाहाजी जावीर यांना रिपाइ कार्यकर्त्यांनी मारहाण करून वागळे पोलिसांच्या ताब्यात दिले. जावीर यांनी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सावरकर-लोकमान्य प्रभागामध्ये ४० बोगस मतदारांना पकडून वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत होता.