शहरातील सर्वात मोठय़ा आनंदनगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर

समूह पुनर्विकास योजनेतून ठाण्याचा चेहरा बदलण्यासाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले असतानाच शहराच्या प्रवेशद्वारी आनंदनगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव विकासकाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सादर केला आहे. त्यामुळे ठाण्यातील या सर्वात मोठय़ा झोपडपट्टीतील २२८० झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्याची आणि शहराचे प्रवेशद्वार झोपडपट्टीमुक्त होण्याची चिन्हे आहेत.

महापालिका आणि रेल्वेच्या नियोजनानुसार याच झोपडपट्टीला लागून असलेल्या मनोरुग्णालयाच्या भागात नवे स्थानक उभारण्याच्या हालचालींनाही सध्या वेग आला आहे. परिसर झोपडपट्टीमुक्त झाल्यास या संपूर्ण पट्टय़ाचा नियोजनबद्ध विकास शक्य होणार आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील झोपडपट्टय़ांचा विकास करण्यासाठी चार वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा विस्तार करण्यात आला. या विभागाचे स्वतंत्र कार्यालय ठाण्यात सुरू झाले. या कार्यालयामार्फत पुनर्विकास प्रस्तावांना मान्यता दिली जाते. ठाणे शहरात १८०० ते १९०० झोपडय़ा असलेल्या परिसरांचे प्रस्ताव प्राधिकरणाकडे यापूर्वी सादर झाले आहेत. त्यामध्ये सुभाषनगर परिसराचा समावेश होता. आनंदनगर भागातील झोपडपट्टय़ांमधील घरांची संख्या २२८० इतकी आहे. ठाणे आणि मुंबई शहराच्या प्रवेशद्वाराजवळच हा परिसर वसला असून शहराचा चेहरा म्हणून या विभागाकडे पाहिले जाते. त्यामुळे शहराचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

योजनेसाठी आवश्यक प्रक्रिया उरकून विकासकाने योजनेचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे दोन दिवसांपूर्वी सादर केला. प्राधिकरणाच्या विविध विभागांकडून प्रस्तावाची तपासणी केली जाणार असून त्यानंतर या प्रस्तावास मान्यता दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अवघ्या वर्षभरात सर्व प्रक्रिया उरकून योजनेसाठी प्रस्ताव सादर करणारा हा पहिलाच परिसर ठरल्याचा दावा संस्थेकडून केला जात आहे.

१०० पैकी ७० प्रस्ताव मंजूर

ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे गेल्या काही वर्षांत १०० प्रस्ताव दाखल झाले असून त्यापैकी ७० प्रस्तावांना आतापर्यंत मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये काही एसआरडी प्रकल्पांचाही समावेश आहे. ७० प्रस्तावांपैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत. उर्वरित ३० प्रकल्प मंजुरी प्रकियेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दोन गृहनिर्माण संस्थांची स्थापना

आनंदनगर परिसरातील ४२ हजार चौरसमीटर शासकीय जागेवर झोपडपट्टय़ा आहेत. पुनर्वसन योजनेसाठी रहिवाशांनी दोन संस्था स्थापन केल्या आहेत. त्यापैकी आनंदनगर नागरी सहकारी गृहनिर्माण संस्थेने झोपु योजनेसाठी १८०० म्हणजेच ८५ टक्के नागरिकांची संमती मिळविली आहे. तसेच झोपडपट्टीधारकाच्या कुटुंबाची आणि त्याच्या घराची माहिती नोंदवण्याचे कामही संस्थेने पूर्ण केले आहे. याशिवाय, प्राधिकरणाने या भागात बायोमेट्रिक सर्वेक्षणही पूर्ण केले आहे.