नेपथ्य, संहिता, प्रकाशयोजना, रंगभूषा आणि वेशभूषा या सर्वाचा मेळ साधत सरस अभिनय करत आशययुक्त एकांकिकांनी ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ची ठाणे विभागीय अंतिम फेरी गुरुवारी गडकरी रंगायतन येथे जल्लोषात पार पडली. ठाणे विभागातून उरण येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाच्या ‘हमीनस्तू’ या एकांकिकेने राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत बाजी मारली.

ठाणे विभागीय अंतिम फेरीत चार महाविद्यालयांमध्ये चुरशीची लढत रंगली. वैविध्यपूर्ण विषयांनीयुक्त दर्जेदार कलाकृतींचे सादरीकरण ठाणे विभागीय अंतिम फेरीत पाहायला मिळाले. ‘गर फिरदौस बर रूये जमी अस्तू, हमीनस्तू हमीनस्तू हमीनस्तू’ धरतीवरील स्वर्ग कुठे आहे तर काश्मीर आहे असे काश्मीर खोऱ्यातील सध्याची धार्मिक, राजकीय वादाची परिस्थिती आणि एक प्रेमकथा यावर भाष्य करणारी ‘हमीनस्तू’ ही एकांकिका राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत ठाणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. याव्यतिरिक्त ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने ‘भोकरवाडीचा शड्डू’ तर ‘हित्यास भूगोल’ ही एकांकिका उल्हासनगर येथील एसएसटी महाविद्यालयाने सादर केली. तसेच डोंबिवली येथील मॉडेल महाविद्यालयाने ‘सतराशे साठ दलिंदर’ ही एकांकिका सादर केली.  ठाणे विभागीय अंतिम फेरीतील चार एकांकिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही गर्दी केली होती. यावेळी सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी आणि रणथंबोर सफारीच्या शितील दीक्षित हे मान्यवर उपस्थित होते.

पारितोषिके.. सवरेत्कृष्ट दिग्दर्शक :

  • निखिल पालांडे आणि गौरव रेळेकर (हमीनस्तू, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण)
  • सवरेत्कृष्ट लेखक : प्राजक्त देशमुख (हमीनस्तू, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण)
  • सवरेत्कृष्ट अभिनय : आकाश सुर्वे (हित्यास भूगोल, एसएसटी महाविद्यालय, उल्हासनगर)
  • सवरेत्कृष्ट नेपथ्यकार : सचिन गोताड (सतराशे साठ दलिंदर, मॉडेल महाविद्यालय, डोंबिवली)
  • सवरेत्कृष्ट संगीत : ओंकार, राहुल आणि हरी (हित्यास भूगोल, एसएसटी महाविद्यालय, उल्हासनगर)

परीक्षक म्हणतात..

स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन तरुणांनी उत्तम सादरीकरण केले. महाविद्यालयीन तरुणांमध्ये अभिनय करताना प्रचंड ऊर्जा दिसून आली. या तरुणांमधून उत्तम कलाकार घडवण्यासाठी लेखक आणि दिग्दर्शकांनी त्यांना अधिक चांगले मार्गदर्शन करायला हवे. – प्रियदर्शन जाधव, अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक

 

ही स्पर्धा तरुणांमध्ये मानाची समजली जाते. यासारख्या स्पर्धामुळे उत्तम कलाकार घडतात. तसेच यासारख्या स्पर्धामुळेच मराठी नाटकांची उणीव भरून निघण्यास मदत होईल. त्यामुळे लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा महत्त्वाची ठरते. – अरविंद औंधे, लेखक आणि दिग्दर्शक

विद्यार्थी म्हणतात-

यापूर्वी अनेक एकांकिका स्पर्धामध्ये सहभागी झालो आहोत. मात्र, लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेत मला माझे पहिले अभिनयाचे पारितोषिक मिळाले, याचा प्रचंड आनंद होत आहे. ‘हित्यास भूगोल’ या एकांकिकेत नाना हे मुख्य पात्र साकारताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.  -आकाश सुर्वे, सवरेत्कृष्ट अभिनेता,एसएसटी महाविद्यालय, उल्हासनगर

 

ही स्पर्धा राज्याच्या आठ केद्रांवर घेतली जाते. त्यामुळे या स्पर्धेत अधिक चुरस पाहायला मिळते. या स्पर्धेच्या ठाणे विभागीय अंतिम फेरीत उत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक मिळाल्याने खूप आनंद होत आहे.    – प्राजक्त देशमुख, सवरेत्कृष्ट लेखक,  कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण

एखाद्या स्पर्धेच्या मागे माध्यम उभे राहते तेव्हा स्पर्धा ही उत्तम होते आणि स्पर्धकांनाही उत्तम व्यासपीठ मिळते. त्यामुळे अशा स्पर्धाना सहकार्य करणे गरजेचे असते. लोकसत्ता लोकांकिका या मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून सहकार्य करण्याचा आनंद आहे. ठाणे विभागीय लोकांकिका स्पर्धेत वेगवेगळे विषय पाहायला मिळाले. सर्वच स्पर्धकांनी उत्तम सादरीकरण केले. – दिलीप कुलकर्णी, सॉफ्ट कॉर्नर