फक्त खेळांसाठीच मैदान देण्याच्या निर्णयाला बगल; भाजपच्या आंबा महोत्सवासाठी पालिकेचे घूमजाव

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले गावदेवी मैदान केवळ खेळांसाठीच खुले करून देण्याचा ठराव करून क्रीडापटूंना दिलासा देणाऱ्या ठाणे महापालिकेने स्वत:च या निर्णयावर पाणी फेरले आहे. भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या आंबा महोत्सवासाठी गावदेवी मैदान खुले करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. विशेष म्हणजे, या मुद्दय़ावरून टीका होण्याची शक्यता गृहीत धरून शेतमाल विक्रीसाठी राज्य सरकारने आखलेल्या धोरणाचा हवाला पालिकेने दिला आहे. मात्र मैदानात आंबा महोत्सव भरणार असल्याने ऐन सुट्टीच्या हंगामात मुलांना खेळण्यासाठी इतरत्र जावे लागणार आहे.

MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
local residence strongly opposed helipad build near janjira dharavi fort
जंजिरे धारावी किल्याजवळील मैदानात उभारल्या जाणाऱ्या ‘हॅलीपॅड’मुळे वातावरण पेटले
Tandlyachya pithache sandge recipe
झटपट दुप्पट फुलणारे तांदळाचे सांडगे; ‘या’ पद्धतीन बनवा कुरकुरीत सांडगे

जुन्या ठाणे शहरात मोकळ्या जागा आणि मैदानांची वानवा असताना येथे वरचेवर लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध प्रदर्शने भरविण्यात येत असल्याने खेळाडूंमध्ये नाराजीचा सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील गावदेवी मैदानांचा वापर खेळाऐवजी प्रदर्शने आणि समारंभांसाठी अधिक होत असे. काही खासगी संस्था नाममात्र भाडे भरून प्रदर्शनासाठी मैदान घेत होत्या आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून नफा मिळवीत होत्या. ही बाब सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी उघड केल्यानंतर शहरातील सर्वच मैदानांमध्ये कार्यक्रमांना बंदी घालण्याची मागणी केली होती. अशी मागणी करण्यात ठाणे शहरातील आणि विशेषत नौपाडा भागातील नगरसेवक अग्रभागी होते. ही मागणी रास्त असल्याचे मान्य करत ठाणे शहरातील मैदाने केवळ क्रीडा आणि कला महोत्सवांसाठीच भाडेतत्त्वावर देण्यात येतील असा निर्णय महापौर मीनाक्षी िशदे यांनी घेतला. या मैदानांचा वापर अन्य कोणत्याही व्यावसायिक किंवा अन्य प्रयोजनांसाठी केला जाणार नाही असा ठरावही सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. हा ठराव व्हावा यासाठी सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी आग्रह धरला, शिवाय महापालिका प्रशासनानेही त्यास संमती दर्शवली. असे असतानाच आमदार केळकर यांच्या आंबा महोत्सवासाठी महापालिकेने गावदेवी मैदान खुले करून दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी मैदानात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १ ते १० मे या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. आंबा महोत्सव आयोजित करणाऱ्या संस्कार संस्थेचे अध्यक्ष म्हणून आमदार केळकर हे कार्यरत आहेत. तर कोकण विकास प्रतिष्ठान हे भाजप सरकारमधील एका बडय़ा नेत्याशी संबंधित आहे. एके काळी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या या नेत्याच्या संस्थेला मैदान नाकारणे जड जाऊ शकते हे लक्षात आल्याने प्रशासनातील ‘विकास पुरुषा’ने शासनाच्या एका निर्णयाचा आधार घेत भाजपपुढे लोटांगण घातल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, राज्यात भाजपशी दोन हात करू पाहणारे ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनीही आपल्या पक्षाच्या महापौराने केलेला ठराव बासनात गुंडाळल्याचे दिसत आहे.

गावदेवी मैदानात विविध कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र राज्य शासनाने शेतमालाच्या विक्रीसाठी महापालिकांनी शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक यापूर्वीच काढले आहे. या परिपत्रकानुसार गावदेवी मैदान आंबा महोत्सवासाठी खुले करून देण्यात आले आहे.

संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

गेल्या दहा वर्षांपासून आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत असून ही शेतकऱ्यांची चळवळ आहे. त्यामागे नफा कमविणे हा उद्देश नसतो. या महोत्सवामध्ये पणन आणि कृषी विभागाचाही सहभाग आहे. शेतकऱ्यांचा विषय असल्यामुळेच महापालिकेने  परवानगी दिली आहे.

संजय केळकर, भाजप आमदार