ठाणे येथील गावदेवी भागातील पुनर्वसितांचे गाळे तोडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची नोटीस गाळेधारकांना दिली नाही आणि कारवाईपूर्वी गाळ्यातील साहित्य बाहेर काढण्याची संधीही दिली नाही. तसेच महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण केल्याचा आरोप असलेले प्रवेश देशपांडे यांना उलट महापालिकेच्या पथकाने मारहाण केली असून या मारहाणीची तक्रार नौपाडा पोलीस घेत नसल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा म्हणून गाळेधारकांनी न्यायालयामध्ये धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण केल्याचा आरोप असलेले गावदेवी भागातील एकविरा पोळी भाजी केंद्राचे मालक प्रवेश देशपांडे यांच्या गाळ्यासह २८ गाळे प्रशासनाने गुरुवारी जमीनदोस्त केले. या कारवाईनंतर गाळेधारक विरुद्घ महापालिका प्रशासन असा संघर्ष सुरूझाला. १९९७ मध्ये ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी शहरात रस्ता रुंदीकरण मोहिम राबविली होती. या मोहिमेत गावदेवी भागातील गाळे तोडण्यात आले होते. मात्र, या गाळेधारकांचे गावदेवी भागातच पुनर्वसन करण्यात आले होते. या गाळ्यांची अधिकृत मालमत्ता कर पावती, पाणी कर पावती, गुमास्ता परवाना, अग्निशमन परवाना, अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना गाळेधारकांकडे आहे. असे असतानाही गाळे तोडण्यापूर्वी प्रशासनाने गाळेधारकांना नोटीस देणे गरजेचे होते. याप्रकरणी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे, असेही मिलींद पाटील यांनी सांगितले.

कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने गाळेधारकांना कोणतीही नोटीस बजावली नाही. तसेच कारवाईपूर्वी गाळेधारकांना त्यांची बाजू मांडण्याची तसेच गाळ्यातील साहित्य बाहेर काढण्याची संधी दिली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

मिलींद पाटील, विरोधी पक्षनेते, ठाणे महापालिका