राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या मधुरिकाच्या वडिलांचे भावोद्गार

गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत सिंगापूरला नमवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरणाऱ्या भारतीय चमूत ठाण्याच्या दोन कन्यांचा समावेश आहे. मधुरिका पाटकर आणि पूजा सहस्रबुद्धे यांच्या या कामगिरीमुळे क्रीडाक्षेत्रात ठाण्याचे नाव उंचावले गेल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ‘राष्ट्रकुल स्पर्धेला निघण्यापूर्वी मधुरिकाने आम्हाला सुवर्णपदक जिंकणार, असा शब्द दिला होता. तो तिने खरा करून दाखवला,’ अशी प्रतिक्रिया मधुरिकाचे वडील सुहास पाटकर यांनी दिली.

पूजा ही सध्या पुण्यात वास्तव्यास असली तरी, ती मूळची ठाणेकर आहे तर, मधुरिका ही ठाण्याची निवासी आहे. या दोघींच्या सुवर्णकामगिरीमुळे ठाण्यातील क्रीडाक्षेत्रात जल्लोषाचे वातावरण आहे. सोमवारी मधुरिकाच्या घरी अभिनंदन करण्यासाठी येणाऱ्यांची अक्षरश: रांग लागली होती. या चाहत्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करताना मधुरिकाचे वडील सुहास पाटकर यांचे आनंदाश्रू थांबत नव्हते. ‘आज, मंगळवारी मधुरिकाचा वाढदिवस आहे. ती वाढदिवशी परदेशात असणार होती. म्हणून आम्ही ती स्पर्धेला निघण्यापूर्वी तिला सोन्याची कर्णफुले भेट दिली. तेव्हा तिने येताना मी पण ‘सुवर्ण’ घेऊन येईन, असा शब्द मला दिला होता. तो खरा ठरवला,’ असे सुहास पाटकर यांनी सांगितले.

वयाच्या सातव्या वर्षांपासून टेबल टेनिस खेळत असलेल्या मधुरिकाने यापूर्वी दोनदा राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सिंगापूरविरुद्धच्या अंतिम लढतीत पराभव झाल्याने तिच्या भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, ती कसर या भारतीय चमूने यंदा भरून काढली. आजवर  १०० हून अधिक जेतेपदे पटकावणाऱ्या मधुरिकाच्या वाटचालीत ठाण्याच्या सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील जडणघडणीचा मोठा वाटा आहे, असे  पाटकर यांनी सांगितले.

प्रशिक्षकांसाठी दुहेरी आनंद

मधुरिका ही होलीक्रास शाळेची विद्यार्थीनी तर पूजा हिने नौपाडय़ातील सरस्वती शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. याच काळात त्या भगवती शाळेच्या मैदानावर टेनिस प्रशिक्षक शैलजा गोहाड यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायच्या. त्यामुळे रविवारचा दिवस गोहाड यांच्यासाठी सुवर्णदिन ठरला.