01 March 2021

News Flash

ठाणे शहरबात : गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा श्रीगणेशा

शाडूच्या मातीची गणेशमूर्ती.. माझी माती, माझा गणपती.. पंचधातूंची मूर्ती..

शाडूच्या मातीची गणेशमूर्ती.. माझी माती, माझा गणपती.. पंचधातूंची मूर्ती.. कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन.. निर्माल्यापासून खत निर्मिती.. पर्यावरणस्नेही फुलांची आरास.. विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रदूषणकारी वाद्यांना प्रवेश बंदी.. अशा अनेक पर्यावरणस्नेही संकल्पना ठाणे शहरामध्ये दहा वर्षांपासून राबवल्या जात आहेत. दरवर्षी ७० टक्कय़ाहून अधिक घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये होत आहे. ठाणे शहर पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची दशकपूर्ती साजरी करत असला, तरी या शहराव्यतिरिक्त जिल्ह्य़ातील अन्य शहरांमध्ये मात्र पर्यावरणस्नेही उपक्रमांची पुरती दयनीय अशीच अवस्था आहे.

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकजागृतीसाठी सुरू झालेल्या गणेशोत्सवाने स्वातंत्र्योत्तर काळातील सुरुवातीची काही र्वष ही परंपरा कायम जोपासली. त्यानंतर मात्र उत्सवाच्या बाजारीकरणाला सुरुवात झाली आणि उत्सवांमध्ये राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि व्यावसायिक मंडळांनी शिरकाव करून या उत्सवाला बाजारू रूप दिलं. त्यामुळे जनजागृतीसाठी स्थापन झालेला हा उत्सव पर्यावणाची मोठी हानी करण्यास जबाबदार ठरू लागला. अवाढव्य उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती.. रस्ते अडवून साजरा होणारा उत्सव.. मोठय़ा आवाजातील ध्वनिक्षेपक लावून ध्वनिप्रदूषणाला हातभार.. शिवाय विसर्जनाच्या वेळी तलाव, खाडी आणि नदीच्या किनाऱ्यावर निर्माल्याचा कचरा आणि मूर्त्यांचा खच पाडण्यात येत होता. उत्सवाला आलेल्या या ओंगाळवाण्या रूपाविरुद्ध दंड थोपटून सगळ्यात पहिल्यांदा पर्यावरणस्नेही उपक्रमाची संकल्पना ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली. विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनीही उत्सवांमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केला. ठाण्यातील जिज्ञासासारख्या संस्थेच्या माध्यमातून उत्सवांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रकल्प शाळांमध्ये सादर करण्यास सुरुवात झाली. मुलांच्या या उपक्रमांना सामाजिक कार्यकर्त्यांनी कायदेशीर पाठबळ देत न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या विषयावर एक जागृतीची भावना निर्माण झाली. मासुंदा तलावामध्ये होणारे जलप्रदूषण आणि तेथील अस्वच्छतेला रोखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. त्यातून महापालिकेने या पर्यावरणस्नेही उपक्रमांना हातभार लावण्यास सुरुवात केली. कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे नदी, तलाव आणि खाडीमध्ये होणारे जलप्रदूषण थांबून मोठय़ा प्रमाणात पाण्यातील जलचरांना जीवदान मिळू शकते. पर्यावरण दक्षता मंचसारख्या संस्थांच्या माध्यमातून हा संदेश घरोघरी पोहचवला गेला आणि त्यामुळेच आज घरगुती गणेशोत्सव कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यासाठी ठाणेकर मोठय़ा संख्येने येऊ लागले आहेत.
जनजागृतीसाठी महापालिकेने विशेष भर दिला असून ‘स्वच्छ ठाणे-सुंदर ठाणे’ याबरोबरच महापौरांकडून ‘हर बार इको त्योहार’सारख्या संकल्पनांचा पुरस्कार करण्यात आला. त्यासाठी ग्रीनी या कार्टून पात्राची मदत घेण्यात आली. महापालिकेच्या पर्यावरणीय जनजागृतीच्या फलकावरील या ग्रीनीने विद्यार्थाना प्रदूषणकारी गणेशोत्सवाची संकल्पना उलगडल्याने या उपक्रमाला आधिकच बळ मिळाले. शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर बहिष्कार घालण्यात आले. थर्माकॉलच्या सजावटीवर बहिष्कार, नैसर्गिक सजावटीचा गौरव करणाऱ्या धोरणांमुळे सार्वजनिक मंडळांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला. महापालिकेच्या गणेशदर्शन स्पर्धेमध्ये त्या स्वरूपाच्या नियम व अटींचा समावेश करण्यात आल्याने या उपक्रमाला अधिकच बळ मिळत गेले.
डोंबिवली शहरामध्ये मात्र अवघ्या दोन ते तीन वर्षांपासून मूर्ती संकलन स्टॉलची सुरुवात काही सामाजिक संस्थांनी केली, मात्र त्यांचा जीव यथातथाच होता. त्यामुळे या भागातील पर्यावरणविषयक असलेली दुर्लक्षाची भावना प्रकर्षांने जाणवते. कल्याण शहरामध्ये ५० हजारांच्या आसपास घरगुती गणपतींचे विसर्जन होते. तर दोनशेहून आधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मोठय़ा प्रमाणात साजरा होणाऱ्या उत्सवानंतर गणेशमूर्तीचे विसर्जन शहरातील विविध ठिकाणी होते. कल्याण पूर्वेत पाच ठिकाणी गणेश विसर्जन केले गेले, त्यामध्ये तिसगाव येथील जरीमरी तलाव, विठ्ठलवाडी तलाव, नांदिवली येथील तलाव, लोकसेवानगर चक्कीनाका येथील तलाव आणि चिंचपाडा खदाण येथे विसर्जन करण्यात आले. कल्याण पश्चिमेत गौरीपाडा तलाव, वालधुनी गणेश घाट, मोहने उल्हास नदी, आधारवाडी जेल येथील तलाव आणि दुर्गाडी किल्लय़ाजवळ असलेल्या गणेश घाट या पाच ठिकाणी विसर्जन करण्यात येते. गणेशघाट येथे कल्याण, उल्हासनगर येथून मोठय़ा प्रमाणात मंडळे विसर्जनासाठी येत असतात. दीड दिवसांचे पाच हजार गणेश, पाच दिवसांचे सुमारे ५० हजारांच्या आसपास गणपती, तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुमारे एक हजारांच्या आसपास सार्वजनिक गणपती या ठिकाणी येतात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विसर्जन करावे लागत असतानादेखील शहरामध्ये एकही कृत्रिम तलाव उभारण्याची तसदी महापालिकेकडून घेतली जात नव्हती. अखेर महापालिकेने यंदाच्या वर्षी २२ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय घेतल्याने ‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणण्याची वेळ कल्याण-डोंबिवलीकरांवर आली आहे.
निर्माल्यापासून खतनिर्मिती
‘स्वच्छ ठाणे-सुंदर ठाणे’ या संकल्पनेअंतर्गत जलप्रदूषण कमी करण्यासाठी ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाच्या आवारात निर्माल्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. शहरातील २० मंदिरे, १७ स्मशानभूमी, एक फूल बाजार याबरोबरच गणेशोत्सव मंडप आणि विसर्जन घाटाला निर्माल्य संकलन केंद्राची जोड देण्यात आली. त्यामुळे वर्षभरात प्रतिदिन सरासरी दोन ते तीन टन निर्माल्य संकलित होऊ लागले आहे. संकलित करण्यात आलेल्या निर्माल्यातून गांडूळ खतनिर्मिती केली जाते. नागरिकांमध्ये जलप्रदूषणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी खतनिर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. ठाणेकरांनी ही प्रक्रिया स्वत: अनुभवावी यासाठी या प्रकल्पाला भेट देण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले होते. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे एक हजार गृहसंकुलांमध्ये निर्माल्य संकलन कलश बसवून प्रत्येक सोसायटीशी हा उपक्रम जोडला जाणार आहे. डोंबिवली शहरातील अनेक सामाजिक, मंदिर देवस्थान आणि सांस्कृतिक संस्थांनीही अशा प्रकारचा निर्माल्यापासून खतनिर्मिती प्रकल्पांना सुरुवात केली आहे. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेशमंदिर संस्थानच्या वतीने निर्माल्यापासून खतनिर्मिती सुरू केली आहे. तर पर्यावरण दक्षता मंच, समर्थ भारत व्यासपीठ यासारख्या सामाजिक संस्थांनी ठाणे शहरामध्ये सुरू केलेल्या पर्यावरण संवर्धन चळवळीतून प्रेरणा घेऊन गेल्या दोन वर्षांपासून कल्याण पूर्वेतील क्षितिज या तरुणांच्या गटानेसुद्धा निर्माल्यापासून गांडूळ खत निर्मितीला सुरुवात केली आहे.

पर्यावरणस्नेही उपक्रमांना पाठबळ..
ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच, समर्थ भारत व्यासपीठ, जिज्ञासा ट्रस्ट आणि सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच ठाणे महापालिकेनेही या उपक्रमाला पाठिंबा दिल्याने हा उपक्रम अधिक बहरत गेला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील अनेक मंडळी या उपक्रमांचा कित्ता गिरवू लागले आहेत. डोंबिवली गणेशमंदिरसारख्या संस्थेच्या वतीने अनेक पर्यावरणविषयक उपक्रम राबवले जात असून, अनेक गणेशोत्सव मंडळंही अशा उपक्रमांना पाठिंबा देऊ लागली आहेत. कल्याण पूर्वेतील क्षितिज ग्रुपदेखील अशाच पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न करत आहे. या उपक्रमांना स्थानिक स्वराज्य संस्थांनीही पाठबळ देण्याची गरज आहे. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या शहरांमध्येही या उपक्रमांचे स्वागत होणे आवश्यक आहेत. तरच खऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा होऊन टिळकांच्या गणेशोत्सवाच्या संकल्पनेचा मुख्य उद्देश साध्य होऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 12:23 am

Web Title: thane gives a thumbs up to eco friendly ganpati
Next Stories
1 तपासचक्र : अंधश्रद्धेच्या संशयातून हत्या
2 शाळेच्या बाकावरून : गणपती येता शाळेत..
3 ठाणे.. काल, आज, उद्या
Just Now!
X