मुंबई महानगर पालिकेप्रमाणे एमएमआर हद्दीतील महानगर पालिकांना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र, या आदेशांचं पालन करण्यासाठी या महानगर पालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याची माहिती समोर येतेय. पालकमंत्र्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत ठाणे महानगर पालिकेने ५ लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचं जाहीरसुद्धा केलंय. मात्र, आता ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना चिंता आहे ती या लसींसाठी लागणारे पैसे आणायचे कुठून? करोना काळात उत्पन्न घटल्यामुळे ठाणे महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. इतकंच नव्हे तर गेल्या महिन्याचा कर्मचाऱ्यांचा पगारही ठाणे महानगर पालिकेकडे असलेल्या जीएसटीच्या पैशातून दिला असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

ठाणे महानगर पालिकेप्रमाणेच कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी या महानगर पालिकांची आर्थिक स्थिती देखील नाजूक आहे.