|| संदीप आचार्य

गेल्या दहा वर्षांत कधीच वेळेवर वेतन मिळालेले नाही. किमान वेतन कायद्यानुसारही वेतन दिले जात नाही. गेले दोन महिने आम्हाला वेतनही देण्यात आले नसून आरोग्यमंत्री दीपक सावंत आमच्या मुलांच्या शाळेची फी देणार का, असा संतप्त सवाल ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात काम करणाऱ्या ९० कंत्राटी सफाई कामगारांनी उपस्थित केला आहे.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील कामगारांनी वेतन मिळावे यासाठी संप करण्याचा इशारा गेल्या आठवडय़ात रुग्णालय प्रशासनाला दिल्यानंतर आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. साधना तायडे यांनी रुग्णालयात जाऊन सफाई कामगारांचा प्रश्न समजावून घेतला. त्यानंतर दोन दिवसांत वेतन देण्याची हमी प्रशासनाने देऊनही या सफाई कामगारांना फुटकी कवडीही ठेकेदाराकडून मिळालेली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर रेनकोट व छत्री दिली जाते. तथापि गेल्या दहा वर्षांत रेनकोट, छत्री, गणवेश देण्यात आला नसल्याचे तसेच रुग्णालय प्रशासनानेही त्याची दखल न घेतल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे.

१५०० खाटा असलेल्या या रुग्णालयात रोज बाह्य़ रुग्ण विभागात सुमारे ७०० रुग्णांना तपासले जाते तर सुमारे १८०० रुग्ण दाखल आहेत. रुग्णांचे एक्स-रे व अन्य वैद्यकीय चाचण्यांसाठी मदत करण्याबरोबर एखाद्या गंभीर रुग्णाला जे.जे. रुग्णालयात पाठवायचे झाल्यास त्याचीही जबाबदारी याच सफाई कामगारांना पार पाडावी लागते.

आरोग्य विभागाने २००७ मध्ये पूर्णवेळ सफाई कामगारांची नियुक्ती करण्याऐवजी सफाई सेवेचे खासगीकरण केले. परिणामी आरोग्य सेवेत सर्वत्र कंत्राटी सफाई कामगारांच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम केले जाते. तथापि मनोरुग्णांलयातील सफाईचे काम हे अधिक कष्टप्रद असून ठेकेदार हे सफाई कर्मचाऱ्याला वेळेत वेतन देतात की नाही तसेच त्याचा भविष्य निर्वाह निधी भरला जातो की नाही हे पाहणे ही सर्वस्वी आरोग्य विभागाची व रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी आहे. गेली अनेक वर्षे या कामगारांना वेळेवर वेतन नाही की भविष्य निर्वाह निधी भरला जातो याचा पत्ता आरोग्य विभागात कोणाला नसेल तर आरोग्य विभागातील उच्चपदस्थ काय करतात, असा सवाल या सफाई कामगारांनी केला.

‘लोकसत्ता’ने या सफाई कामगारांच्या प्रश्नाबाबत बातमी दिल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली मात्र अद्यापि वेतन देण्यात आलेले नाही. सध्या आम्हाला ३१७ रुपये प्रतिदिन वेतन मिळते प्रत्यक्षात किमान वेतन कायद्यानुसार ४४८ रुपये मिळणे आवश्यक असून तेही गेल्या दोन महिन्यांपासून मिळालेले नाही. आमच्या मुलांच्या शाळेची फी भरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून दीपक सावंत आमच्या मुलांची फी भरणार का, असा सवाल या कामगारांनी केला. याबाबत आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांना विचारले असता सोमवारी हा प्रश्न निश्चित सोडवेन, असे आश्वासन त्यांनी दिले.