01 March 2021

News Flash

जलवाहिन्यांवर भाईंदरचा ताण!

पाण्याचा दाब वाढल्यामुळे जुन्या वाहिन्या फुटण्याच्या घटना

गेल्या आठवडय़ात शीळ येथे जलवाहिनी फुटल्याने एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता.

सागर नरेकर

अंबरनाथ शहरात असलेल्या जांभुळ जलशुद्धीकरण केंद्रातून थेट ५६ किमी अंतरावर असलेल्या मीरा-भाईंदर महानगर शहराला जुन्याच जलवाहिन्यांतून होत असलेल्या वाढीव क्षमतेच्या आणि वाढीव दाबाच्या पाणी पुरवठय़ामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शीळ भागातील जलवाहिन्या वारंवार फुटू लागल्या असून याचा भार ठाणे आणि इतर शहरांवर पडू लागला आहे.

शीळ जलवाहिनी फुटीमुळे आतापर्यंत ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पनवेल तसेच अंबरनाथ शहरासही अनेकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. ४० वर्षांपुर्वी टाकण्यात आलेल्या या जलवाहिन्या मीरा-भाईदर शहरास पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अपेक्षीत असणारा दाब संतुलित असमर्थत ठरत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. गेल्या आठवडय़ात शनिवारी शीळ परिसरात दुरुस्तीच्या कामानंतर एमआयडीसीच्या जलवाहिनी फुटल्याचे समोर आले होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते. जुन्या क्षमतेच्या जलवाहिन्यांमधूनच वाढीव पाणीपुरवठा केला जात असल्याने या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. अंबरनाथच्या जांभुळ येथून अनुR मे एक हजार ६०० मिलीमीटर क्षमतेच्या एक आणि एक हजार ७७२ मिलीमीटर क्षमतेच्या दोन जलवाहिन्यांमधून दररोज सुमारे ७४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा २४ तास सुरू असतो. यात एक जलवाहिनी जांभूळ ते काटईपर्यंत पुरवठा करते, तर उर्वरित दोन जलवाहिन्या शिळ, ठाणे, मिरा भाईंदरपर्यंत पाणी वाहून नेतात. ऐंशीच्या दशकात टाकण्यात आलेल्या या जलवाहिन्या काही दशलक्ष लिटर पाणी वाहून नेण्याइतपत सक्षम आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरांची पाणी गरज वाढली आहे. हे पाणी जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून गुरुत्वाकर्षणाने शीळमार्गे साकेत परिसरातल्या बुस्टिंग केंद्रापर्यंत पोहोचवले जाते. तेथून पुढे मीरा भाईंदर महापालिकेची यंत्रणा पंपाद्वारेपर्यंत शहरात पाणी पोहोचवते. बुस्टींग केंद्रापर्यंत हे पाणी पोहोचवण्यासाठी पाण्याचा दाब अधिक ठेवावा लागतो. मात्र पाण्याचा दाब आणि क्षमता वाढली असला तरी जुनाट जलवाहिन्यांवर प्रचंड दाब येतो. त्यात डोंबिवलीजवळच्या एक्सपिरीया मॉल ते खिडकाळी हा भाग सखल असल्याने येथील जलवाहिन्यांचा जमीन, माती, जमिनीवरील साचलेले पाणी याच्याशी जवळचा संबंध येतो. त्यामुळे या जलवाहिन्यांची मोठय़ा प्रमाणावर झीज झाली आहे. दुरुस्तीच्या कामानंतर पाण्याची वाढलेली मागणी आणि  पाण्याचा अधिकचा दाब यामुळे ताण वाढून  जलवाहिन्या  फुटत असल्याची माहिती एमआयडीसी सूत्रांनी दिली आहे.

या जलवाहिन्या बदलण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे. करोनाच्या संकटात काही काळ हे काम बंद पडले होते. त्यात या ठिकाणी सुरू असलेले रस्त्याचे काम, वाढलेली वाहतूक यांमुळे जलवाहिन्या बदलण्याच्या कामात संथपणा आल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.

एमआयडीसीकडून कुणाला किती पाणी?

* ठाणे महापालिका : १४१ द.ल.लि.

* मीरा भाईंदर : १०५ द.ल.लि.

* उल्हासनगर : १५५ द.ल.लि.

* कल्याण डोंबिवली : ७५ द.ल.लि.

* नवी मुंबई : ७५ द.ल.लि.

* अंबरनाथ : २१ द.ल. लि.

* पनवेल : १ द.ल.लि.

* औद्योगिक वसाहती : १५० द.ल.लि.

* ग्रामपंचायती व इतर : ५५ द.ल.लि.

जलवाहिन्या जुन्या असून त्याच्या बदलण्याचे काम सध्याच्या घडीला सुरू आहे. या कामात टाळेबंदीत संथपणा आला होता. लवकरच ते काम पूर्ण होईल. त्यामुळेच जलवाहिनी फुटली होती.

– मारुती कलकुटकी, कार्यकारी अभियंता, महापे विभाग, एमआयडीसी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 12:13 am

Web Title: thane incidence of rupture of old ducts due to increase in water pressure abn 97
Next Stories
1 जाहिरात हक्कविक्रीतून टीएमटीला १० कोटी
2 चार महिन्यांपासून प्रेयसीच्या मृतदेहासोबत वास्तव्य; हत्या करुन भिंतीत गाडलेला मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले
3 मतदानासाठी सुट्टी न दिल्यास कारवाई
Just Now!
X